गायी नेणाऱ्या 5 जणांवर गोरक्षकांचा हल्ला; 1 ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

गोरक्षकांनी त्यांना अडवले तेव्हा त्यांनी आपण गायी खरेदी केल्या असल्याचा पुरावाही दाखवला, तरीही त्यांच्यावर गोरक्षकांनी हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

जयपूर : गायींची वाहतूक करत असल्याबद्दल राजस्थानमध्ये तथाकथित गोरक्षकांनी पाचजणांवर हल्ले केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी अलवार येथील एकाचा मृत्यू झाला आहे. 

पहलू खान (वय 55) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते मूळचे हरियानाचे रहिवासी आहेत. खान यांच्यासह इतर चारजण गायी घेऊन जात होते. गोरक्षकांनी त्यांना अडवले तेव्हा त्यांनी आपण गायी खरेदी केल्या असल्याचा पुरावाही दाखवला, तरीही त्यांच्यावर गोरक्षकांनी हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

विश्व हिंदू परिषद आणि बंजरंग दलाशी संबंधित गोरक्षकांनी शनिवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठवरील जगुवास चौकात चार वाहने अडवली. त्या वाहनांतून बेकायदेशीरपणे गायी नेण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही वाहने जयपूरहून येत होती. ती हरियानातील नूह जिल्ह्यात जात असताना हा प्रकार घडला, असे बेहरोर पोलिस ठाण्याचे प्रमुख रमेशचंद सिनसिनवार यांनी सांगितले. 

त्या वाहनांतील लोकांवर हल्ला केला त्यावेळी तथाकथित गोरक्षकांनी अर्जून नावाच्या चालकाला सोडून दिले. पाचही पीडित लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पेहलू खान यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला.