चिनी नागरिकाकडून भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान; तक्रार दाखल

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

'ओप्पो' या चिनी कंपनीच्या नोएडा येथील उत्पादन विभागातील एका कर्मचाऱ्याने भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने कंपनीतील दोन हजार कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे.

नोएडा - "ओप्पो' या चिनी कंपनीच्या नोएडा येथील उत्पादन विभागातील एका कर्मचाऱ्याने भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने कंपनीतील दोन हजार कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे.

"सोमवारी चिनी नागरिक असलेल्या कंपनीतील वरिष्ठ अधिकारी सुभायूने कंपनीची तपासणी केली. यावेळी दुपारी साडे तीनच्या सुमारास त्याने भारतीय राष्ट्रध्वज असलेले पोस्टर फाडले आणि ते कचऱ्याच्या डब्यात टाकले. काही कर्मचाऱ्यांनी ही बाब पाहिली आणि लक्षात आणून दिली. मात्र त्याने दुर्लक्ष केले', अशी माहिती कंपनीतील एका कर्मचाऱ्याने दिली. त्यानंतर कंपनीतील दोन हजार कर्मचाऱ्यांनी नोएडातील सेक्‍टर 63 मधील "ओप्पो' कंपनीच्या मुख्य इमारतीबाहेर निदर्शने केली. तब्बल नऊ तास चाललेल्या या निदर्शनादरम्यान कर्मचारी "भारत माता की जय' अशा घोषणा देत होते. निदर्शनादरम्यान "योगी' आणि "मोदी' यांच्या नावाचा समावेश असलेल्या घोषणाही देण्यात आल्या. सकाळी सात वाजता पोलिस घटनास्थळी आले. जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर तक्रार दाखल केली जात नाही तोपर्यंत निदर्शने थांबविली जाणार नाहीत, असा इशारा संतप्त निदर्शकांनी दिला. त्यानंतर भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली, अशी माहिती ग्रोव्हर यांनी दिली.

'आम्ही या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. या दुर्दैवी प्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. या प्रकरणात आम्ही संबंधित (चौकशी) अधिकाऱ्यांना हवे ते सर्व सहकार्य करू आणि योग्य ती कारवाई करणार आहोत. "ओप्पो'ला भारतीयांचा अत्यंत आदर आहे. आमचे 99 टक्के कर्मचारी भारतीय आहेत', असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.