'संघा'च्या कोविंद यांच्याविरोधात उमेदवार हवाच: कम्युनिस्ट पक्ष

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

कोविंद हे रा. स्व. संघाचे नेते आहेत. संघ परिवाराच्या दलित मोर्चाचे ते अध्यक्ष होते. संघाच्या कोणाही उमेदवाराविरोधात आम्ही लढा देऊच. संघाचे नेते देशाचे आणखी तुकडे करतील

हैदराबाद - राष्ट्रपतिपदासाठी भाजपने जाहीर केलेले उमेदवार रामनाथ कोविंद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते असल्याने त्यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करणे आवश्‍यक आहे, अशी भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतली आहे.

दलित नेते आणि बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव आज भाजपने जाहीर केल्यानंतर भाकपचे सरचिटणीस सुधारकर रेड्डी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले,""कोविंद हे रा. स्व. संघाचे नेते आहेत. संघ परिवाराच्या दलित मोर्चाचे ते अध्यक्ष होते. संघाच्या कोणाही उमेदवाराविरोधात आम्ही लढा देऊच. संघाचे नेते देशाचे आणखी तुकडे करतील. भाजपने गेल्या तीन वर्षांमध्ये देशाचे तुकडे केले आहेत. त्यामुळे कोविंद यांच्याविरोधात लोकशाहीवादी उमेदवार हवा.''

टीडीएस, टीआरएसचा पाठिंबा
भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या तेलगू देसम पक्षाने राष्ट्रपतिपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या नावाला सहमती दर्शविली आहे. भाजपने अतिशय योग्य निवड केली असल्याचे पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.

तेलंगणमधील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रपतीपदासाठी दलित चेहरा असावा ही मागणी "टीआरएस'नेच भाजपकडे केली होती, असा दावाही या पक्षाने यावेळी केला.