देवभूमीची प्रतिमा मलीन करणाऱ्यांना हद्दपार करा: मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मतदानावर बहिष्कार टाका
अलमोडा : उत्तराखंडमधील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून सामाजिक लढाई सुरू करावी, अशी मागणी माओवाद्यांनी केली आहे. नैनिताल जिल्ह्यातील धारी येथे या मागणीचे विविध फलक आज निदर्शनास आले. विविध विद्यालये सार्वजनिक ठिकाणी भिंती रंगवून याबाबतचा संदेश देण्यात आला आहे. दरम्यान, हे पोस्टर हटविण्यात आले असून, माओवाद्यांच्या कोणत्याही कृतीस सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हरिद्वार : गेल्या 16 वर्षांत राज्याने किती प्रगती साधली, याचा विचार उत्तराखंडमधील जनतेने करावा. आगामी पाच वर्षे राज्यासाठी महत्त्वाची असून, देवभूमीची प्रतिमा मलीन करणाऱ्यांना जनतेने सत्तेतून हद्दपार करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित रॅलीप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ""प्रत्येकाच्या आयुष्यातील सोळा वर्षे ही खूप महत्त्वाची असतात, त्यानंतरचा काळ हा समोर येणाऱ्या गोष्टींना आकार देण्यात जातो. उत्तराखंडमधील भ्रष्टाचार हा न्यायालयात सिद्ध करण्याची गरज नसून, पूर्ण देशाने तो टीव्हीवर पाहिला आहे. जी देवभूमी स्थिती आहे, ती आता यापुढे राहणार नाही.''

अटलबिहारी वाजपेयी यांनी राज्यासाठी निश्‍चित केलेली ध्येये आगामी काळात वास्तवात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. येथील जनतेने जर भाजपला संधी दिली, तर राज्याने गमावलेला सन्मान व ओळख पुन्हा प्राप्त होईल, असे आश्वासन मोदींनी या वेळी दिले.

कॉंग्रेसच्या कारकिर्दीत बेरोजगारीचे प्रमाण दुप्पट
डेहराडून : राज्यातील तरुणांना विविध आमिषे दाखवून राज्यात सत्तेत आलेल्या कॉंग्रेसच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे एका अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पाच वर्षांपूर्वी बेरोजगार असलेल्या तरुणांची संख्या (5.65 लाख) झपाट्याने वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेल्या वर्षी राज्यात तब्बल 9 लाख 38 हजार तरुणांच्या हाताला काम नसल्याची माहिती यातून समोर आली आहे. 2015-16 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक 2.3 लाख तरुणांनी आपण बेरोजगार असल्याची नोंद सरकार दफ्तरी केली आहे. यापैकी किती जणांना नोकरी अथवा रोजगार मिळाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी दरवर्षी या संख्येत 1 लाख नवीन तरुणांची भर पडत असल्याचे निदर्शनास येते.
 

Web Title: ouster them from devbhoomi, says modi