12 वर्षांत 500 मुलींवर अत्याचार करणाऱ्यास अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेला आरोपी मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. 1990 मध्ये तो दिल्लीत आला. सध्या तो टेलर म्हणून काम करत होता.

नवी दिल्ली - दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीने गेल्या 12 वर्षांत 500 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. या नराधमास 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

दिल्लीत पोलिसांनी सुनील रस्तोगी या 38 वर्षीय व्यक्तीला दोन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली. मात्र, याने गेल्या बारा वर्षांत 500 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. रस्तोगी हा विवाहित आरोपीला पाच मुले असून, त्यापैकी तीन मुली आहेत. सुनीलला यापूर्वी उत्तराखंडमध्ये असताना सहा महिन्यांचा कारावासही भोगावा लागला होता.

एखादी वस्तू देण्यासाठी तुमच्या पालकांनी मला पाठवले आहे, असे सांगून विद्यार्थिनींना भुलवायचो. त्यांना अज्ञातस्थळी नेऊन त्यांच्यावर अत्याचार करायचो, अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली. दिल्लीच्या न्यू अशोक नगर भागात आरोपी सुनील रस्तोगीने दोघींवर अत्याचार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी आरोपीला अटक केली. पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेला आरोपी मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. 1990 मध्ये तो दिल्लीत आला. सध्या तो टेलर म्हणून काम करत होता.