पाकला होणारी टोमॅटो, मिरची निर्यात बंद

पाकला होणारी टोमॅटो, मिरची निर्यात बंद

अहमदाबाद - भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असताना गुजरातमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी पाकिस्तानला होणारी टोमॅटो आणि मिरचीची निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या निर्णयाचा मोठा फटका स्थानिक शेतकऱ्यांनाही बसेल. गुजरातमधील भाजीपाला बाजारपेठेत दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
 

हा आर्थिक व्यवहार यामुळे मंदावू शकतो. गुजरातमधून दररोज ५० ट्रकमधून दहा टन भाजीपाला वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानमध्ये पाठविण्यात येतो. आता उभय देशांमध्ये निर्माण झालेला तणाव लक्षात घेता तो थांबविण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे ‘अहमदाबाद जनरल कमिशन एजंट असोसिएशन’चे सरचिटणीस अहमद पटेल यांनी सांगितले.

भारताने १९९७ नंतर प्रथमच पाकिस्तानला होणारी भाजीपाल्याची निर्यात पूर्णपणे थांबविली आहे. जोपर्यंत तणाव कमी होत नाही तोपर्यंत आम्ही पाकला भाजीपाला पाठविणार नाही, असे पटेल यांनी नमूद केले. एजंट असोसिएशन ही संघटना भाजी विक्रेते आणि शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करते. टोमॅटो, मिरची, लिंबू आणि तोंडली यांसारख्या महत्त्वाच्या भाज्यांची पाकला निर्यात करण्यापूर्वी मुख्य विक्रेत्यांना एजंट असोसिएशनची परवानगी घ्यावी लागते. पाकिस्तानसोबतचा व्यापारच बंद झाल्याने शेतकऱ्यांचे तीन कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. पण वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहित महत्त्वाचे असल्याने आम्ही ते सहन करू, असेही पटेल यांनी यावेळी नमूद केले.

अन्य देशांना निर्यात सुरूच
पाकिस्तानला होणारी भाजीपाला निर्यात बंद होणार असली तरीसुद्धा बांगलादेश, आखाती देश, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेसोबतचा व्यापार मात्र कायम राहील. मेहसाणा जिल्ह्यामध्ये टोमॅटोचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. येथील शेतकऱ्यांनी खूप आधीच पाकला होणारी टोमॅटोची निर्यात थांबविली आहे. दिल्ली आणि पंजाबमधील जे व्यापारी पाकला भाजीपाल्याची निर्यात करतात त्यांनी भाजीपाला न विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे, असे यशवंतपुरा गावाचे सरपंच दशरथ पटेल यांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये आमच्या भाजीपाल्यास कितीही चांगली किंमत मिळाली तरीसुद्धा आम्ही आमच्या भाज्या तिकडे पाठविणार नाहीत.
- हरजीवन पटेल, स्थानिक शेतकरी, खंदेरपुरा

मागील वर्षी आम्ही पाकिस्तानला तीन टन टोमॅटोची निर्यात केली होती, पण यावेळेस आम्ही एक भाजीही तिकडे पाठविणार नाही.
- मनसुख पटेल, स्थानिक शेतकरी, गोविंदपाडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com