पाकला एकाकी पाडण्यासाठी पर्यायांची चाचपणी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

सीमेवरील संपूर्ण अव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे जबाबदार आहेत. भारताच्या सीमा आणि राष्ट्रीय सुरक्षेवर गेल्या दोन वर्षांपासून हल्ला होत आहे. यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना जबाबदार ठरविले पाहिजे. याबद्दल मोदी त्यांच्याविरुद्ध कारवाई करतील?

- रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते

नवी दिल्ली - उरीतील दहशतवादी हल्लाप्रकरणी भारताकडून कोणत्याही प्रकारे तत्काळ प्रत्युत्तराची कारवाई केली जाणार नसल्याचे आज सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. त्याच वेळी या प्रकरणी प्रत्युत्तर दिले जाईल, परंतु त्याचे स्वरूप आणि वेळ कोणती निवडायची, हा पर्याय भारताने खुला ठेवला असल्याचेही सांगण्यात आले. भारतातर्फे विचारपूर्वक प्रत्युत्तर दिले जाईल, हेही सरकारने स्पष्ट केले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचे खरे स्वरूप उघड करण्यासाठीची मोहीम राबविणे, पाकिस्तानला एकाकी पाडणे आणि त्याचबरोबर अशा दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्याच्या उपाययोजना करणे, अशी सर्वसाधारण रणनीती सरकारतर्फे आज सूचित करण्यात आली.

उरी दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांची संख्या १८ झाली आहे. या हल्ल्यात काल (रविवारी) १७ जणांना वीरमरण आले होते. आज (सोमवारी) सकाळी उपचारादरम्यान आणखी एका जवानाचा मृत्यू झाला. शिपाई विकास जनार्दन कुळमेथे असे आज हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. 

उरी हल्लाप्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आणि त्याचेच प्रतिध्वनी भाजपच्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रियांतून ऐकू आले होते. भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी ‘दाताच्या बदल्यात जबडा तोडा’ अशी प्रतिक्रिया दिली होती. तर पंतप्रधानांनीदेखील हा प्रकार करणाऱ्यांना शिक्षा केली जाईल, असे आश्‍वासन देशाला दिले होते. परंतु आज मात्र सरकारचा सूर बदललेला होता आणि सरकारने या प्रकरणी तारतम्याने आणि तोलूनमापूनच आगामी कृती केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले.

 

आज सायंकाळी सहा वाजता ले. जनरल रणबीरसिंह (डायरेक्‍टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स) यांनी पत्रकारांना माहिती दिली. पाकिस्तानने या हल्ल्याच्या संदर्भात जे ‘कारवाईक्षम पुरावे व माहिती’ (ॲक्‍शनेबल इन्फॉर्मेशन) मागितली आहे ती पुरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. काल हा हल्ला जैशे महंमद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने केल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आल्यानंतर पाकिस्तानने प्रथम ही बाब नाकारली होती; परंतु नंतर दोन्ही देशांच्या ‘डीजीएमओं’च्या झालेल्या चर्चेनंतर या संदर्भातील पुरावे द्यावेत, अशी मागणी पाकिस्तानने केली.

 

रणबीरसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या चार दहशतवाद्यांजवळून ४ एके रायफल्स, चार अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर्स, ३९ ग्रेनेड्‌स, ५ हातबाँब, २ रेडिओसेट आयकॉम्स, २ जीपीएस, २ नकाशे, २ मेट्रिकशीट्‌स (गायडिंग पॉइंट्‌स), मोठ्या प्रमाणात अन्न व खाद्यवस्तू तसेच औषधे मिळाली. या वस्तू पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या व तसे शिक्के असलेल्या आहेत. दरम्यान, हल्ल्यानंतर या परिसरात सुरू करण्यात आलेली छाननी व शोधमोहीम आज सायंकाळी थांबविण्यात आली आणि आता तेथे दहशतवादी नसल्याचे साफ झाल्यानंतर आता तो खुला करण्यात आला आहे.

 

रणबीरसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत घुसखोरीचे प्रकार वाढत आहेत आणि ते यशस्वीपणे मोडून काढले जात आहेत. या हल्ल्यावरील प्रत्युत्तराबाबत बोलताना ते म्हणाले, की भारतीय लष्कराकडे प्रत्युत्तराची पूर्ण क्षमता आहे; परंतु हे प्रत्युत्तर कधी द्यायचे आणि कसे द्यायचे त्याची वेळ व स्थळ भारत ठरवील. तो पर्याय भारताने खुला ठेवलेला आहे.

 

कालच्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळपासूनच सुरक्षाविषयक बैठका सुरू होत्या. सर्वप्रथम गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या नॉर्थब्लॉक येथील कार्यालयात एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार डोवाल आणि इतर वरिष्ठ लष्करी, तसेच गुप्तचर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर ही मंडळी पंतप्रधानांच्या ७ रेसकोर्स मार्ग या निवासस्थानी गेली. तेथे जवळपास दोन तास बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधानांशिवाय गृहमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री अरुण जेटली, डोवाल, लष्करप्रमुख दलबीरसिंह आणि इतर वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर राजनाथसिंह आणि पंतप्रधानांची स्वतंत्र भेट व चर्चाही झाली.

 

या बैठकीबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली, तरी माहीतगार गोटातून मिळत असलेल्या माहितीनुसार, प्रत्युत्तरादाखल भारताकडून कोणतीही अविचारी कृती होणार नाही, अशी खबरदारी घेण्याचे ठरविण्यात आल्याचे समजते. भारताची आंतरराष्ट्रीय जगतातील प्रतिमा लक्षात घेऊन या घटनेला भारताचा प्रतिसाद हा परिपक्व आणि धीरगंभीर; परंतु निश्‍चयी व निर्धाराचा असला पाहिजे, असेही बैठकीत ठरविण्यात आले. या रणनीतीचा भाग म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानचे दहशतवाद्यांना आश्रय, मदत देण्याचे खरे स्वरूप उघडकीस आणणे, यास प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरू असलेल्या परिषदेतही हा मुद्दा प्राधान्याने उपस्थित करण्यास मान्यता देण्यात आली. पाकिस्तानला जागतिक स्तरावर एकाकी पाडण्याची मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आल्याचे कळते. दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठीदेखील काही आक्रमक पावले उचलण्याची चर्चा असली, तरी ती अत्यंत काळजीपूर्वक आणि खबरदारीनेच करण्यावरही भर देण्यात आला. भारताच्या प्रतिमेला कोठेही धक्का बसणार नाही आणि जगभरात भारताकडे ज्या आदराने पाहिले जाते, त्याला कोठे तडा जाणार नाही अशाच पद्धतीने कारवाई करण्याचे संकेत दिले जात आहेत.

 

शहीद जवानाचे पद/नाव जिल्हा/राज्य 

1) सुभेदार कर्नेल सिंग - जम्मू, जम्मू आणि काश्‍मीर 

2) हवालदार रवी पॉल - जम्मू, जम्मू आणि काश्‍मीर 

3) शिपाई राकेश सिंह - कौमूर, बिहार 

4) शिपाई जावडा मुंडा - खुटी, झारखंड 

5) शिपाई नैमान कुजूर - चैनपूर, झारखंड 

6) शिपाई उइके जानराव - अमरावती, महाराष्ट्र 

7) हवालदार एन. एस. रावत - राजसमंड, राजस्थान 

8) शिपाई गणेश शंकर - संत कबीरनगर, उत्तर प्रदेश 

9) नाईक एस. के. विद्यार्थी - गया, बिहार 

10) शिपाई विश्‍वजित घोराई - 24 परगणा, प. बंगाल 

11) लान्सनायक चंद्रकांत गलांडे - सातारा, महाराष्ट्र 

12) शिपाई जी. दलाई - हावडा, प. बंगाल 

13) लान्सनायक आर. के. यादव - बलिया, उत्तर प्रदेश 

14) शिपाई हरिंदर यादव - गाझीपूर, उत्तर प्रदेश 

15) शिपाई टी. एस. सोमनाथ - नाशिक, महाराष्ट्र 

16) हवालदार अशोककुमार सिंह - भोजपूर, बिहार 

17) शिपाई राजेश सिंह - जौनपूर, उत्तर प्रदेश

18) शिपाई के. विकास जनार्दन

 

परराष्ट्रमंत्र्यांचा सहभाग नाही

आजच्या बैठकांमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा कोठेच सहभाग नव्हता. त्याचप्रमाणे परराष्ट्र मंत्रालयाचा कोणीही प्रतिनिधी या बैठकांमध्ये दिसून आला नाही. परराष्ट्र सचिव एस. जयशंकरदेखील यामध्ये सहभागी नव्हते. ही बाब काहीशी आश्‍चर्यकारक मानली जात आहे; परंतु सुषमा स्वराज २४ तारखेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या अधिवेशनाला हजर राहण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार आहेत आणि आज ठरविण्यात आलेल्या रणनीतीनुसार त्यांनी तेथे उरी घटनेचा संदर्भ देऊन पाकिस्तानतर्फे दहशतवाद्यांना आश्रय आणि मदत कशी दिली जात आहे, हा मुद्दा उपस्थित करणे अपेक्षित आहे. महासभेपुढे त्यांचे २६ सप्टेंबरला भाषण होणार आहे.

 

काश्‍मीरमधील सध्याच्या घडामोडी पाहता, लष्कराने सतर्क राहण्याची गरज आहे. दहशतवाद्यांविरुद्ध संतापाच्या भरात कोणताही निर्णय घेऊन चालणार नाही; तसेच त्यासाठी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

- जनरल व्ही. के. सिंह, परराष्ट्र राज्यमंत्री

 

उरीतील हल्ल्यानंतर भविष्यातील कारवाईविषयी भारत काळजीपूर्वक निर्णय घेईल आणि पाकिस्तान काय म्हणतो, यावर आधारित काहीही केले जाणार नाही. 

- किरण रिज्जू, केंद्रीय मंत्री

 

मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली - उरीतील लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर काल झालेल्या हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांना घडामोडींची माहिती दिली. उरी हल्ल्यासंदर्भात मोदींनी सकाळी वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली होती. सायंकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन मुखर्जी यांच्याबरोबर चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

मोदीजी बदला घ्या! - हुतात्मा जवानाच्या मुलीचे आवाहन

गया - उरी हल्ल्यात हुतात्मा झालेला जवान सुनीलकुमार विद्यार्थी यांच्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद घालत या हल्ल्याचा बदला घ्या, असे भावनिक आवाहन केले आहे. चंदौती गावचे रहिवाशी असलेल्या सुनीलकुमार यांना काल झालेल्या हल्ल्यात वीरमरण आले. पत्रकारांनी त्यांच्या नातेवाइकांची भेट घेतली असता त्यांनी निषेध व्यक्त करीत ठोस भूमिका घेण्याची मागणी केली. सुनीलकुमार यांची १३ वर्षीय मुलगी आरतीकुमारी ही हुंदका आवरत मोदीजी ‘ईट का जवाब पत्थर से दो’ असे म्हणाली. सरकारने किमान आतातरी जवानांना मोकळीक देऊन दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची परवानगी द्यावी, अशी प्रतिक्रिया सुनीलकुमार यांच्या पत्नी किरणदेवी यांनी दिली. 

राजकीय आघाडीवर...

राजनाथसिंह, मनोहर पर्रीकर, अजित डोवाल, जनरल दलबीरसिंह सुहाग यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

हल्ल्याच्या चौकशीला लष्कराकडून सुरवात; ‘एनआयए’चे पथक उरीत दाखल

भविष्यकालीन धोरण काळजीपूर्वक ठरवणार - किरण रिज्जू

थेट युद्धाची क्षमता नसल्याने पाकिस्तानचे छुपे युद्ध - प्रकाश जावडेकर 

पाकिस्तानला दहशतवादी ठरविण्यास जगाने एकत्र यावे - वेंकय्या नायडू

काश्‍मीरवरून लक्ष हटविण्याचा भारताचा प्रयत्न - पाकिस्तानचा कांगावा

जागतिक स्तरावर हल्ल्याचा निषेध

पाकबरोबरचा नियोजित युद्धसराव रशियाकडून रद्द

@esakalupdate - उरीतील दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रत्येकाच्या मनात संताप आहे आणि जवानांबद्दल आदराची भावना आहे. अशा वेळी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसोबत सारा महाराष्ट्र उभा राहायला हवा. आपण आपल्या भावनांना वाट करून देऊ #MaharashtraSalutes या हॅशटॅगद्वारे.