पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पीटीआय
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

सांबा, कथुआ आणि जम्मू जिल्ह्यातील काही ठिकाणी काल रात्री उशिरा तोफगोळे आणि बंदुकीच्या गोळ्यांचा मारा करण्यात आल्याची माहिती बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने दिली. पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असले तरी, बीएसएफने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे त्यांचा प्रयत्न फसल्याचे समजते.

जम्मू - पाकिस्तानी रेंजर्सकडून सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) छावण्या आणि नागरिकांना पुन्हा लक्ष्य करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील सांबा, कथुआ आणि जम्मू जिल्ह्यांत पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील कंडी येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांत धुमश्‍चक्री सुरू आहे.

कंडी येथील भागात दोन किंवा तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या शोधमोहीम सुरू केली असून, या दरम्यानच ही धुमश्‍चक्री सुरू झाल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरातून गोळीबाराचा आवाज आला आहे. मात्र, चकमक सुरू आहे किंवा नाही, याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार काल रात्री नऊनंतर या गोळीबाराला सुरवात झाली होती. आज सकाळी आठच्या सुमारास संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील गोळीबार आणि तोफांचा मारा पूर्णपणे थांबला; यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सध्या सुरू असलेला तोफा आणि गोळीबार यासाठी वापरण्यात आलेला दारूगोळा पाहता पाकिस्तानी लष्कर हे पाकिस्तानी रेंजर्सना मदत करत असल्याचेही बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आज कंडी येथे सुरू असलेली शोधमोहीम अद्याप सुरू असून, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या लक्ष्यवेधी हल्ल्यानंतर सीमेवरील दहशतवादी कारवाया वाढल्या असून, पाकिस्ताननने अनेकदा शस्त्रसंधीचा भंग केला आहे.