उ.प्रदेश विधानसभेचा पहिल्याच दिवशी झाला आखाडा

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

माजवादी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली; व राज्यपालांच्या दिशेने फलक भिरकाविले. यानंतर लोकप्रतिनिधींनी राज्यपालांच्या दिशेने फाईल व पुस्तकेही फेकण्यास सुरुवात केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी नाईक यांच्याभोवती तातडीने सुरक्षा कडे केले

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये आज (सोमवार) विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालत राज्यपाल राम नाईक यांच्या दिशेने फलक भिरकाविले.

राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचा आजचा पहिलाच दिवस होता. या नव्या विधानसभेस राज्यपाल संबोधित करत असतानाच समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली; व राज्यपालांच्या दिशेने फलक भिरकाविले. यानंतर लोकप्रतिनिधींनी राज्यपालांच्या दिशेने फाईल व पुस्तकेही फेकण्यास सुरुवात केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी नाईक यांच्याभोवती तातडीने सुरक्षा कडे केले.

राज्यपालांकडे या वस्तु भिरकाविणाऱ्या सदस्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यांचाही समावेश होता. राज्यामधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाल्याचा आरोप करत विरोधकांनी विधानसभेमध्ये गदारोळ सुरु केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील यावेळी सभागृहात उपस्थित होते.

या सभागृहाचे कामकाज पहिल्यांदाच दूरदर्शनवरुन "लाईव्ह' दाखविण्यात येत होते. "सर्व उत्तर प्रदेश तुमच्याकडे पाहतो आहे,' असे असहाय्य राज्यपालांनी सांगूनदेखील गोंधळ घालणाऱ्या सदस्यांनी फलक, पुस्तके फेकणे सुरुच ठेवले.