जयललिता मृत्यूवरून संसदेत पुन्हा गोंधळ

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मार्च 2017

अण्णा द्रमुकच्या सदस्यांकडून सीबीआय चौकशीची मागणी

नवी दिल्ली : तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणी अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत लावून धरली. आपले म्हणणे मांडण्याची संधी न मिळाल्याच्या निषेधार्थ त्यांनी निषेध म्हणून सभागृहातून काढता पाय घेतला.

सभागृहात प्रश्‍नोत्तराला सुरवात होताच अण्णा द्रमुकचे काही नेते आपल्या हातात पोस्टर घेऊन सभापतींच्या आसनाजवळ पोचले. या पोस्टरवर जयललिता यांचे छायाचित्र होते. त्यांच्या मृत्यूची सीबीआयद्वारे चौकशी करावी, असा मजकूर लिहिला होता. घोषणाबाजी करणाऱ्या नेत्यांना सभापती सुमित्रा महाजन यांनी शून्य प्रहरात तुमचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे आश्‍वासन दिले; मात्र तरीही घोषणाबाजी सुरू राहिल्याने लोकसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
11 वाजून 20 मिनिटांनी कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर अण्णा द्रमुकच्या एका नेत्याने हा मुद्दा महत्त्वाचा असून, आमचे म्हणणे मांडण्यास परवानगी न मिळाल्याच्या कारणावरून सर्व पक्ष सदस्य सभागृह सोडतील, असे स्पष्ट केले. त्यानंतर या नेत्यांनी पुन्हा सभापतींच्या आसनाजवळ एकत्र येत घोषणाबाजी करून सभागृह सोडले.

राज्यसभेतही गोंधळ
राज्यसभेचे कामकाज सुरू होताच अण्णा द्रमुकच्या के. वी. मैत्रेयन यांच्यासह तीन सदस्यांनी सभापतींच्या आसनाजवळ जाऊन घोषणाबाजी सुरू केली. उपसभापती पी. जे कुरियन यांनी त्यांना शून्य प्रहरात म्हणणे मांडण्याच्या सूचना केल्यानंतर ते आपल्या जागेवर जाऊन बसले. त्यानंतर मैत्रेयन यांनी जयललिता यांच्या प्रकृतीविषयी संबंधित रुग्णालयाकडून एकाच दिवशी वेगवेगळी माहिती देण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत याची सीबीआयद्वारे चौकशी करावी, अशी मागणी केली.

Web Title: Parliament again confusion Jayalalithaa death