गोवा: पर्रीकर उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांचे प्रत्येकी 3, तसेच अपक्ष रोहन खौंटे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष गोविंद गावडे यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्तेचा दावा.

पणजी : मनोहर पर्रीकर यांनी आज (सोमवार) संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला असून, मंगळवारी ते संध्याकाली 5 वाजता गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

भारतीय जनता पक्षाने इतर पक्षाच्या व अपक्ष आमदारांशी बोलणी करून सरकार स्थापन करण्यासाठी कसोशीने गोळाबेरीज केल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रीकर यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले आहे. पर्रीकर यांनी राज्यपालांना भेटून आपल्याला 21 आमदारांचा पाठिंबा असल्याचे दाखवून सरकार स्थापनेचा दावा केला होता. 
गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांचे प्रत्येकी 3, तसेच अपक्ष रोहन खौंटे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष गोविंद गावडे यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्तेच्या स्पर्धेत काँग्रेसला बाजूला ठेवले आहे.

दरम्यान, पर्रीकर यांच्या जागी संरक्षणमंत्री म्हणून कोणावर जबाबदारी सोपविली जाणार ते अद्याप निश्चित झालेले नाही. एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याकडे हे खाते सोपविले जाण्याची शक्यता भाजपमधील सूत्रांनी वर्तविली.