प्रवासी गाड्यांत "ईएमयू'ची योजना शीतपेटीत?

प्रवासी गाड्यांत "ईएमयू'ची योजना शीतपेटीत?

मात्र, प्रदूषण टाळण्यासाठी रेल्वेचा विद्युतीकरणावर जोर
नवी दिल्ली - रेल्वेच्या डिझेल इंजिनांमुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे होणारे भीषण प्रदूषण टाळण्यासाठी 2020-21 पर्यंत आणखी 24 हजार 400 किलोमीटरच्या लोहमार्गांचे संपूर्ण विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे मंत्रालयाने समोर ठेवले आहे. मात्र मेट्रो गाड्यांप्रमाणे वेगळ्या इंजिनाची गरज नसलेल्या इलेक्‍ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयू) प्रवासी गाड्यांमध्ये बसविण्याची महत्त्वाकांक्षी योजना मात्र चांगलीच अडकली आहे. राजधानी, शताब्दी गाड्यांमध्ये ही प्रणाली लागू करण्याची योजनाही आता जणू शीतपेटीत टाकल्याचे चित्र आहे.

रेल्वेच्या वतीने कार्बन उत्सर्जन घटविण्यासाठी विजेवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविण्यासंबंधी उद्या (ता. 3) दिल्लीत आंतरराष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. एका पाहणीनुसार केवळ रेल्वे इंजिनांच्या धुरामुळे 22 दशलक्ष टन इतके महाप्रचंड कार्बन उत्सर्जन होते. यासाठीच रेल्वेने पारंपरिक विजेबरोबरच सौरऊर्जा आणि वायुऊर्जा यांचा उपयोग करून 2020 पर्यंत 90 टक्के मार्गांवरील रेल्वेगाड्या चालविण्याचे नियोजन केले आहे, असे रेल्वे मंडळाचे सदस्य व्ही. के. आगरवाल यांनी सांगितले. मात्र या विद्युतीकरणासाठी रेल्वे इंजिनेच नव्हे तर डब्यांचीही रचना बदलावी लागणार आहे. त्यासाठीच्या तांत्रिक तयारीची वस्तुस्थिती मात्र त्यांनी स्पष्ट केली नाही. केवळ कालका शताब्दीच्या काही फेऱ्या व मुंबई राजधानीचे डबेच सध्या काही प्रमाणात विजेवर चालू शकतात.

दिल्ली मेट्रोप्रमाणेच रेल्वेगाड्याही "ईएमयू' पद्धतीने चालविण्याची योजना 2014 मध्ये कल्पनेच्या पातळीवर अवतरली. मात्र पावणेतीन वर्षे झाली तरी प्रचंड आवाज व प्रदूषण करणाऱ्या डिझेल इंजिनांऐवजी नव्या प्रणालीने राजधानी, शताब्दीसह मालगाड्याही चालविण्याचे "अच्छे दिन' अद्याप फार दूर असल्याची वस्तुस्थिती आहे. "ईएमयू' प्रणालीनुसार रेल्वेगाड्यांत आवश्‍यक ते तांत्रिक फेरबदल करण्यापूर्वीची टेंडर प्रक्रिया सुरू करण्याच्याही हालचाली रेल्वेने सुरू केलेल्या नाहीत. ती योजना अर्ध्यावरच सोडून रेल्वे आता विद्युतीकरणाकडे वळल्याचे दिसत आहे.

आगरवाल म्हणाले, की रेल्वेने "मिशन इलेक्‍ट्रिफिकेशन' ही योजना वेगाने सुरू केली आहे. मात्र डिझेल इंजिने विद्युत इंजिनांत परिवर्तित करताना काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. त्यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापावेतो 17 गाड्यांच्या, एकूण लोहमार्गांच्या 42 टक्के म्हणजे 28 हजार किलोमीटर मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

रेल्वेच्या इतिहासात आतापर्यंत सर्वांत जास्त म्हणजे वर्षभरात 280 इंजिने डिझेलवरून विजेवर रूपांतरित केली आहेत. यामुळे प्रवासी व मालवाहतूक मिळून वर्षाला 13 हजार कोटी रुपयांची डिझेलबचत झाली आहे. एकट्या मुंबई राजधानीच्या डब्यांचे विद्युतीकरण झाल्याने तब्बल तीन हजार कोटी रुपयांचे डिझेल वाचले आहे. रेल्वेने दरवर्षी सुमारे 800 किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात मागील वर्षी त्याच्या दुप्पट म्हणजे 1730 किलोमीटर तर या वर्षी दोन हजार किलोमीटर मार्गांचे विद्युतीकरण झाले व पुढील वर्षी हे उद्दिष्ट चार हजार किलोमीटरपर्यंत वाढविण्याचे आहे. यासाठी आवश्‍यक विद्युत इंजिनांच्या निर्मितीचे काम वाराणसी, मधेपुरा व इतर ठिकाणच्या रेल्वे इंजिनांच्या कारखान्यांत सुरू आहे.

सौर, पवनऊर्जेवर भर
पारंपारिक विजेबरोबरच सौरऊर्जा व पवनऊर्जा यांचीही निर्मिती रेल्वेद्वारे केली जाणार आहे. 2020 पर्यंत एक हजार मेगावॉट सौरऊर्जा व 500 मेगावॉट पवनऊर्जा निर्मिती करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. मात्र यासाठी लागणारा खर्च अफाट आहे. एक मेगावॉट अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी पाच हजार कोटी रुपये इतका खर्च येतो, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रदूषणमुक्तीच्या मार्गावर...
28 हजार किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण
2000 किलोमीटर या वर्षी विद्युतीकरण झालेले मार्ग
22 दशलक्ष टन इंजिनांच्या धुरामुळे होणारे कार्बन उत्सर्जन
280 डिझेलवरून विजेवर रूपांतरित इंजिने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com