डाळींच्या साठ्यांवरील मर्यादा उठविली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 मे 2017

महाराष्ट्रासारख्या डाळउत्पादक राज्यात अजूनही शेतकऱ्यांकडे डाळीचे नवे उत्पादन हाती येत आहे. डाळीचे विक्रमी उत्पादन झाल्याने आणि पुरेशी खरेदी न झाल्याने आता नव्याने येणाऱ्या डाळीला आधारभूत दर देखील मिळेनासा झाल्याने शेतकरी अडचणीत आले. त्यांना पडत्या दरात डाळ विकण्याची पाळी आली होती

नवी दिल्ली - सर्व डाळींच्या साठ्यांवरील मर्यादा तत्काळ शिथिल करण्याचे आदेश केंद्र सरकारने आज सर्व राज्यांना दिले. डाळउत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या डाळींसाठी आधारभूत दर मिळून त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.

केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी ट्‌विट करून या निर्णयाची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या भूमिकेतून केंद्र सरकारने डाळीच्या साठ्यावर मर्यादा घालणारे सर्व निर्बंध उठविण्यास राज्यांना सांगितले आहे आणि हा निर्णय तत्काळ अमलात आणण्यास सांगितले आहे, असे पासवान यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रासारख्या डाळउत्पादक राज्यात अजूनही शेतकऱ्यांकडे डाळीचे नवे उत्पादन हाती येत आहे. डाळीचे विक्रमी उत्पादन झाल्याने आणि पुरेशी खरेदी न झाल्याने आता नव्याने येणाऱ्या डाळीला आधारभूत दर देखील मिळेनासा झाल्याने शेतकरी अडचणीत आले. त्यांना पडत्या दरात डाळ विकण्याची पाळी आली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना आधारभूत दर मिळावा व त्यांची डाळ खरेदी केली जावी, यासाठी साठ्यावरील नियंत्रणे पूर्णपणे हटविण्यात येत असल्याचे पासवान यांनी म्हटले आहे.