पेटीएमचा 'तो' निर्णय रद्द; प्रामाणिक ग्राहकांना दिलासा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

'लाखो ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेऊन, कंपनीने दोन टक्के शुल्क आकारणीचा निर्णय मागे घेतला आहे. पेटीएमचा गैरवापर करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातील', असे पेटीएमने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नवी दिल्ली: क्रेडिट कार्डद्वारे पेटीएमच्या वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करण्यासाठी लागू करण्यात आलेले दोन टक्के शुल्क रद्द करण्याचा निर्णय पेटीएमने घेतला आहे.

'लाखो ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेऊन, कंपनीने दोन टक्के शुल्क आकारणीचा निर्णय मागे घेतला आहे. पेटीएमचा गैरवापर करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातील', असे पेटीएमने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पेटीएमची स्पर्धक असलेल्या मोबिक्विक या कंपनीने क्रेडिट कार्डावरून वॉलेटमध्ये येणाऱ्या रकमेवर शुल्क आकारण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. सध्या, पेटीएमने निर्णय मागे घेतला असला तरीही मोबिक्विने हे शुल्क कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

का आकारले होते पेटीएमने शुल्क?
क्रेडिट कार्डद्वारे पेटीएमचे युजर्स क्रेडिट कार्डद्वारे पेटीएमच्या वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करतात. त्यापैकी काही युजर्स रोख रक्कम वापरता यावी यासाठी पेटीएमवरील वॉलेटमधील रक्कम बँक खात्यात हस्तांतरित करतात. या प्रकारामध्ये पेटीएमला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. ही बाब लक्षात आल्याने कंपनीने क्रेडिट कार्डद्वारे पैसे हस्तांतरित करणाऱ्यांवर दोन टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला होता. क्रेडिट कार्डशिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून पेटीएमच्या वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करणाऱ्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचेही कंपनीने जाहीर केले होते. मात्र आता क्रेडिट कार्डद्वारे हस्तांतरित केलेल्या रकमेवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे कंपनीने जाहीर केल्याने पेटीएमच्या प्रामाणिक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

शेअर बाजार आणि आर्थिक घडामोडींची अधिक माहिती घेण्यासाठी आमच्या खास अर्थ विषयक www.sakalmoney.com या संकेतस्थळाला भेट द्या.