माझ्या कामाच्या वेळांमुळे लोकांच्या पोटात का दुखते? - सिद्धू

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

आमदार झाल्यानंतरही दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधील सहभाग कायम ठेवणार असल्याचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधील आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी जाहीर केले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या वादाबाबत बोलताना "माझ्या कामाच्या वेळांमुळे लोकांच्या पोटात का दुखते?', असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

अमृतसर (पंजाब) - आमदार झाल्यानंतरही दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधील सहभाग कायम ठेवणार असल्याचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधील आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी जाहीर केले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या वादाबाबत बोलताना "माझ्या कामाच्या वेळांमुळे लोकांच्या पोटात का दुखते?', असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धू म्हणाले, 'माझ्या दूरचित्रवाहिन्यांवरील (टीव्ही) मालिकांमधील सहभागामुळे माझ्या कामकाजावर काहीही परिणाम होणार नाही. काही वेळा मी सात दिवस सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम केले; तर सहानंतर मी काय करायचे याच्याशी कोणालाही काहीही देणे-घेणे नाही. जर मी महिन्यातील चार दिवस रात्रीचे सात वाजल्यापासून सकाळच्या सहा वाजल्यापर्यंत काम केले तर लोकांच्या पोटात का दुखते?'

सिद्धू यांच्याकडे सध्या पंजाबच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रीपदाची जबाबदारी आहे. दरम्यान सिद्धू यांनी टीव्ही मालिकांमध्ये सहभाग घेण्याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री कायदेशीर सल्ला घेत आहेत.