ईशान्य भारतातील पेट्रोल पंपांची तपासणी

पीटीआय
गुरुवार, 6 जुलै 2017

गुवाहाटी - पेट्रोल पंपावर इंधन वितरणात गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्याने सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीने ईशान्य भारतातील पेट्रोल पंपांची धडक तपासणी केली आहे.

गुवाहाटी - पेट्रोल पंपावर इंधन वितरणात गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्याने सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीने ईशान्य भारतातील पेट्रोल पंपांची धडक तपासणी केली आहे.

कंपनीने 15 जूनपासून सुरू केलेल्या कारवाईत आसाम, मेघालय आणि नागालॅंडमधील 14 पेट्रोल पंपांवर इंधन वितरणात गैरप्रकार सुरू असल्याचे समोर आले. कंपनीच्या पंपांवर वितरित होणाऱ्या इंधनाचा दर्जा आणि माप तपासण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये काही पंपांवर कमी इंधन दिले जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर देशभरात ही कारवाई कंपनीने सुरू केली आहे. यासाठी राज्य सरकारांसोबत विशेष कृती पथके कंपनीने स्थापन केली आहेत. ही पथके पंपांची अचानक तपासणी करीत आहेत.

ईशान्य भारतात कारवाई करण्यासाठी 45 पथके नियुक्त करण्यात आली होती आणि त्यात शंभर अधिकाऱ्यांचा समावेश होता. ईशान्य भारतात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे 879 पेट्रोल पंप असून, त्यातील 542 पंप आसाम राज्यात आहेत.

ग्राहकांना बक्षिसे
इंधनाचा दर्जा आणि माप योग्य असावे, यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कंपनीने पावले उचलली आहेत. पेट्रोल पंपांवर इंधनाची तपासणी करणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जात आहेत.