सुरेश प्रभूंचा राजीनामा; पियुष गोयल रेल्वेमंत्री

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नुकतेच दोन अपघात झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रभू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मोदींकडे दिला होता. त्यावेळी हा राजीनामा मोदींनी स्वीकारला नव्हता. आज नव्या चेहऱ्यांना मंत्री करण्यात आल्यानंतर प्रभू यांनी आपला राजीनामा दिला.

नवी दिल्ली : मोदी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाचा कार्यक्रम रविवारी दिल्लीत पार पडल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर, कॅबिनेटमंत्रीपदी बढती मिळालेल्या पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रीपद देण्यात आले आहे.

सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रपती भवनामध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. दिल्लीतील काल रात्रीपर्यंतच्या घडामोडी पाहता आजचा फेरबदल फक्त भाजपपुरताच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेना व नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या हाती काहीच लागले नाही. मंत्रिमंडळाचा आज सकाळी विस्तार झाल्याने खाते वाटपात कोणाला कोणती खाती मिळणार याकडेही देशाचे लक्ष लागले आहे. सुरेश प्रभूंच्या कामगिरीवर स्वत: मोदी नाराज होते. नुकतेच दोन अपघात झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रभू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मोदींकडे दिला होता. त्यावेळी हा राजीनामा मोदींनी स्वीकारला नव्हता. आज नव्या चेहऱ्यांना मंत्री करण्यात आल्यानंतर प्रभू यांनी आपला राजीनामा दिला.

प्रभू यांनी राजीनामा देताना सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. त्यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली होती.