प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

सुमारे आठ हजार किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त प्लॅस्टिक पिशव्या कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीसाठी पाठवाव्यात, अशी सूचना लवादाने केली

नवी दिल्ली - दिल्ली सरकारने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आठ हजार किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या असून, त्या नष्ट करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले.

राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हे निर्देश दिले. दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने विघटनशील नसलेल्या प्लॅस्टिक पिशव्या नष्ट करण्यासाठी मार्ग शोधावेत, असे लवादाने म्हटले. सुमारे आठ हजार किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त प्लॅस्टिक पिशव्या कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीसाठी पाठवाव्यात, अशी सूचना लवादाने केली. या प्रकरणी पुढील सुनावणी 5 सप्टेंबरला होणार आहे.

लवादाने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आणल्यानंतर दिल्ली सरकारने आठ हजार किलो पिशव्या जप्त करून तीन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. लवादाने 10 ऑगस्टला ही बंदी आणली होती. बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्याचेही निर्देश लवादाने दिले होते.