तीन महिन्यांतील प्रवासाची माहिती सादर करा

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मागील तीन महिन्यांत केलेल्या प्रवासाची माहिती सोमवारपर्यंत सादर करण्याचा आदेश पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यावर सर्व मंत्र्यांशी समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचेही समजते.

नवी दिल्ली : मागील तीन महिन्यांत केलेल्या प्रवासाची, कार्यक्रमांची माहिती देण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी यांनी मंत्र्यांना याबाबतचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येते. केंद्र सरकारच्या योजना आणि नोटाबंदीच्या निर्णयाचा मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात प्रचार केला की नाही, याची चाचपणी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मागील तीन महिन्यांत दिल्लीच्या बाहेरील कार्यक्रमांची, प्रवासाची माहिती मंत्र्यांनी सादर करावी, असे सांगण्यात आले आहे. जर त्यांनी प्रवास केला नसेल, तर ते दिल्लीत कार्यालयात उपस्थित होते असे मंत्र्यांनी नमूद करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारी योजना, मुख्यत्वे नोटाबंदीच्या निर्णयाबाबत मंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये काय जागृती केली, याबाबतची माहिती घेण्यासाठी मोदींनी ही माहिती मागविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.