काँग्रेसची आजही आणीबाणीसारखीच मानसिकता : पंतप्रधान

PM Modi Criticizes on Congress on the issue of Emergency
PM Modi Criticizes on Congress on the issue of Emergency

मुंबई : न्यायसंस्थेला घाबरविण्यासाठी सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग आणणाऱ्या काँग्रेसची मानसिकता आजही आणीबाणीच्या काळासारखीच आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) मुंबईत केली. लोकशाहीवरील निष्ठा मजबूत राखण्यासाठी आणीबाणीच्या इतिहासातील काळ्या अध्यायाचे कधीही विस्मरण होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

तत्कालीन काँग्रेसच्या इंदिरा गांधी सरकारने लादलेल्या आणीबाणीच्या काळ्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी भाजपने ‘1975 आपातकाल – लोकतंत्र की अनिवार्यता, विकास मंत्र लोकतंत्र’ या विषयावर आयोजित केलेल्या जनसंवादामध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, की 1975 साली लादलेली आणीबाणी म्हणजे एखाद्या परिवारासाठी घटनेचा कसा दुरुपयोग केला जाऊ शकतो, याचे दुर्मिळ उदाहरण आहे. काँग्रेसने आणीबाणीत देशातील न्यायसंस्थेला भयभीत केले. एका परिवाराच्या सत्ता सुखासाठी न्यायसंस्थेचे अवमूल्यन करून त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवला. आणीबाणीच्या काळातील काँग्रेसची ही मानसिकता आजही कायम आहे. काँग्रेसने न्यायसंस्थेला धमकावण्यासाठी सरन्यायाधीशांविरोधात क्षुल्लक कारणांवरून महाभियोग दाखल केला. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी अधिक जागरुक राहण्याची गरज आहे.

पुढे ते म्हणाले, की लोकशाहीबद्दलच्या आपल्या वचनबद्धतेचे आणि संविधानाबद्दलच्या समर्पित वृत्तीचे सातत्याने स्मरण करण्याची गरज आहे. लोकशाहीवरील आपली निष्ठा मजबूत रहावी, यासाठी आणीबाणी हा इतिहासातील काळा अध्याय कधीही विसरता कामा नये. सध्याच्या आणि पुढच्या पिढीला जागरूक करण्यासाठी आणीबाणी लादली. त्या दिवसाचे आपण स्मरण करतो.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की काँग्रेसने आणीबाणी लादून देशातील लोकशाही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. पण जनता झुकली नाही. असंख्य कार्यकर्त्यांनी आणीबाणीविरोधात दिलेल्या लढ्याचा विजय म्हणजे लोकशाही आणि संविधानाचा विजय आहे. त्या दिवसाचे स्मरण आवश्यक आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान वाचविणार म्हणतो, पण देशाच्या संविधानाला सर्वाधिक धोका काँग्रेस व त्या पक्षाच्या साथीदारांचाच आहे. देशातील लोकशाही व संविधान संपविण्याचा प्रयत्न कोणी केला हे पुढच्या पिढीलाही समजण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com