मोदीच काश्मीरला दलदलीतून बाहेर काढतील: मुफ्ती

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

आधीच्या पंतप्रधानांना पाकिस्तानात जायचे होते, पण हिंमत केली नाही. पंतप्रधान मोदी लाहोरला गेले, हे शक्तीचे लक्षण आहे. पंतप्रधान मोदींच काश्मीरला दलदलीतून बाहेर काढू शकतात. मोदीजी जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा आहे.

श्रीनगर - काश्मीरला दलदलीतून बाहेर काढण्याचे काम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात, असा विश्वास जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला.

काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. दगडफेकीच्या घटनांमुळे जनजीवन बिघडले आहे. दहशतवादी बुऱ्हाण वणीला ठार मारल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली आहे. या मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रीत करत मुख्यमंत्री मुफ्ती यांनी पंतप्रधान मोदींवरच विश्वास असल्याचे म्हटले आहे. 

मुफ्ती म्हणाल्या, की आधीच्या पंतप्रधानांना पाकिस्तानात जायचे होते, पण हिंमत केली नाही. पंतप्रधान मोदी लाहोरला गेले, हे शक्तीचे लक्षण आहे. पंतप्रधान मोदींच काश्मीरला दलदलीतून बाहेर काढू शकतात. मोदीजी जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा आहे. काश्मीरमधील सध्याची स्थिती योग्य नाही. या तणावाच्या स्थितीचा जम्मू आणि लडाखवरही परिणाम झाला आहे. जम्मू आजही पर्यटन स्थळ असून, त्याच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत.