देवभूमीला राक्षसांपासून मुक्त करा: मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

हिमाचल प्रदेशला लुटणाऱ्यां घरी पाठवण्याची वेळ आली आहे. देशात जागा मिळेल तेथे काँग्रेसला हटविण्यात येत आहे. हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तेच आपल्या जाहिरनाम्यात भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन देत आहेत.

कांगडा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह आणि काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडत देवभूमीला राक्षसांपासून मुक्त करा असे आवाहन केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज (गुरुवार) हिमाचल प्रदेशात दोन सभा घेतल्या. मोदींनी काँग्रेसला लक्ष्य करत जनतेकडून देशभरातून काँग्रेसची सफाई करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

मोदी म्हणाले, की हिमाचल प्रदेशला लुटणाऱ्यां घरी पाठवण्याची वेळ आली आहे. देशात जागा मिळेल तेथे काँग्रेसला हटविण्यात येत आहे. हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तेच आपल्या जाहिरनाम्यात भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन देत आहेत. त्यांच्या या आश्वासनावर कोणीच विश्वास ठेवू शकत नाही. हिमाचलमध्ये मी खूप वेळ घालविलेला आहेत. येथील परिस्थितीची मला जाणीव आहे. काँग्रेसने हिमाचल प्रदेशच्या शोषणासाठी पाच राक्षस तयार केले. या राक्षसांना हटविण्यासाठी 9 नोव्हेंबरला भाजपला मत द्या.