अमरनाथच्या सुरक्षेतील त्रुटीची जबाबदारी मोदींनी स्वीकारावी- राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

अमरनाथच्या निरागस यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. 
- राहुल गांधी

नवी दिल्ली : "अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला हा गंभीर असून, सुरक्षेतील ही त्रुटी अस्वीकारार्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा हल्ला पुन्हा कधीही न घडण्याची खबरदारी घ्यायला हवी," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. 

सोमवारी रात्री आठ वाजून 20 मिनिटांनी जम्मू-काश्‍मीर राज्यामधील अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला बांटिगू भागात हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवादी पळून जाऊ लागले. पळून जाताना त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात एकूण नऊजण मृत्युमुखी पडले. 

याबाबत राहुल गांधींनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, "असल्या भ्याड दहशतवाद्यांच्या हल्ल्याने भारत कधीही डगमगणार नाही."
अमरनाथच्या निरागस यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. 

मी भेटलो, पण 'तो' झुलणारा माणूस पंतप्रधान मोदी
तत्पूर्वी, राहुल गांधी चीनच्या राजदूताला भेटल्याबाबतची चर्चा देशभर सुरू होती. भाजपने त्यांचा निषेध व्यक्त केला होता. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीची आठवण करून दिली. 
राहुल म्हणाले, "महत्त्वाच्या विषयांची माहिती घेणे हे माझे काम आहे. होय, मी चिनी राजदूत, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, ईशान्येतील काँग्रेस नेते आणि भुतानी राजदूत यांना भेटलो."
मात्र, यापूर्वी चीनचे हजारो सैन्य भारताच्या हद्दीत घुसले होते त्यावेळी जिनपिंग यांच्यासोबत झोक्यावर झुलत होता तो माणूस मी नव्हे तर पंतप्रधान मोदी हे होते, असे प्रत्युत्तर राहुल यांनी दिले.