जगभरात भारतीय सैन्याच्या पराक्रमाची चर्चा-मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

आज जगभरात भारतीय सैन्याच्या पराक्रमाची चर्चा होत आहे. यापूर्वी इस्त्राईलच्या सैन्याची होत होती. आता भारतीय जवानांची होत आहे. हिमाचल ही फक्त देवभूमी नसून, वीरभूमीसुद्धा आहे.

मंडी - भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची जगभरात चर्चा आहे. पूर्ण देशाला भारतीय सैन्याच्या पराक्रमावर अभिमान असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी येथे तीन विद्युत प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर प्रथमच मोदी हिमाचल प्रदेशात गेले आहेत. मंडी येथे आयोजित सभेत पंतप्रधानांनी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक केले.

पंतप्रधान म्हणाले, ''आज जगभरात भारतीय सैन्याच्या पराक्रमाची चर्चा होत आहे. यापूर्वी इस्त्राईलच्या सैन्याची होत होती. आता भारतीय जवानांची होत आहे. हिमाचल ही फक्त देवभूमी नसून, वीरभूमीसुद्धा आहे. येथील प्रत्येक कुटुंबीतील नागरिक सैन्यात आहे. या जवानांना मी नमन करतो. देवभूमीवर येऊन येथील नागरिकांना भेटण्याचे भाग्य मला मिळाले, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आज उद्घाटन झालेल्या विद्युत योजनांना कामांना अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सुरवात झाली होती. आज याचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. मी काशीचा खासदार असून, आज छोट्या काशीत येण्याची संधी मला मिळाली. आम्ही लोकसभा निवडणुकीत वन रँक वन पेन्शनचे आश्वासन दिले होते. आम्ही हे आश्वासन पूर्ण केले आहे.''