'हिट ऍण्ड रन' प्रकरणी उद्योगपतीला अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

दिल्लीतील पश्‍चिम विहार परिसरात पाच मार्च रोजी अतुल अरोरा (वय 17) नावाचा तरुण आपल्या दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी मर्सिडीज मोटारीतून जाणाऱ्या आरोपीने अतुलला धडक दिली. या अपघातात अतुलच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली - दिल्लीतील पश्‍चिम विहार परिसरात पाच मार्च रोजी झालेल्या "हिट ऍण्ड रन' प्रकरणात एका किशोरवयीन युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आज (बुधवार) दिल्लीतील एका तरुण उद्योगपतीला ताब्यात घेतले आहे.

दिल्लीतील पश्‍चिम विहार परिसरात पाच मार्च रोजी अतुल अरोरा (वय 17) नावाचा तरुण आपल्या दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी मर्सिडीज मोटारीतून जाणाऱ्या आरोपीने अतुलला धडक दिली. या अपघातात अतुलच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. अपघाताच्या वेळी मर्सिडिजमध्ये आरोपीचा एक मित्रही होता. हे दोघेही हॉटेलमध्ये जेवणासाठी निघाले होते.

अपघातस्थळावरून पोलिसांना दुचाकीचे काही भाग मिळाले आहेत. त्यावरून दुचाकीला मोठ्या वाहनाने धडक दिल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज राजौरी गार्डन येथून 27 वर्षांच्या एका उद्योगपतीला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.