उपोषणप्रकरणी 'आप' नेते संजीव झा ताब्यात 

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

माझ्या उपोषणामुळे कोण भयभीत झाले आहे, हे आपणास माहीत नाही; मात्र आपल्याला कोठेही नेले तरी आपले उपोषण सुरूच ठेवणार.
- संजीव झा, आपनेते 

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी केलेल्या परदेश दौऱ्यांचा तपशील मिळावा, या मागणीसाठी कपिल मिश्रा यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून, त्यांच्या उपोषणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणारे आप नेते संजीव झा यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. 

संजीव झा यांनी आज उपोषणास सुरवात केली; मात्र याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मिश्रा जोपर्यंत सत्य कथन करत नाहीत, तोपर्यंत आपले उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार झा यांनी व्यक्त केला.

माझ्या उपोषणामुळे आपविरोधक भयभीत झाले असून, मला झालेल्या अटकेवरून हे स्पष्ट होते. जेथे कपिल मिश्रांच्या उपोषणाला चार दिवस झाले; मात्र तेथे आपण उपोषण सुरू करताच अटक करण्यात आली. यामागे कोणाचा हात आहे, असा प्रश्नही झा यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या प्रश्नांची उत्तर टाळण्यासाठी कोणता नवीन ड्रामा करणार, असा सवाल कपिल मिश्रा यांना ट्‌विटरद्वारे केला आहे. संजीव यांचे स्वागत असून, केजरीवाल यांच्या अंधभक्तांपैकी ते एक आहेत. देव त्यांना सद्बुध्दी देवो, असा टोलाही मिश्रा यांनी लगावला. 

झा यांना झालेली अटक पाहता कपिल मिश्रांनी सुरू केलेल्या उपोषणाला केंद्र सरकारचे फूस असल्याचे स्पष्ट होते.
- प्रिती शर्मा मेनन, आप नेत्या