पोलिस भरतीत पोटाचेही मोजमाप

श्‍यामल रॉय - सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 मार्च 2017

अर्जात होणार घेराची नोंद; योग व शारीरिक कवायती अनिवार्य

कोलकता: पोलिस भरतीत शारीरिक क्षमतेला महत्त्व असते. त्यामुळेच तशी चाचणीही घेतली जाते. मात्र, त्यातून उत्तीर्ण होऊन पोलिस दलात भरती झाले की व्यायामाकडे दुर्लक्ष होत असल्याने पोलिसांचे वाढते वजन आणि पोटाचा घेर हा चेष्टेचा विषय बनतो; पण आता पोलिस दलात काम करण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या अर्जात उमेदवाराने पोटाचा घेर किती आहे, हे नमूद करणे अनिवार्य असेल. त्यानंतरच त्यांना मुलाखत आणि शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.

पोलिसांच्या वाढत्या पोटाच्यासंदर्भात कोलकता उच्च न्यायालयात कमल डे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याच्या पुराव्यांसाठी गोलमटोल पोट असलेल्या पोलिसांची 30 छायाचित्रेही सादर केली आहेत. पोलिस कायद्यात पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लेख त्यांनी याचिकेसोबत केला आहे. ही याचिका फेटाळून लावावी, अशी विनंती करणाऱ्या सरकारी वकिलाला न्यायाधीशांनी चांगलेच झोडपले. पोलिसांच्या पोटाचा आकार नियंत्रणात ठेवण्यासाठी काय उपाय योजले, अशी विचारणा खंडपीठाच्या हंगामी मुख्य न्यायाधीश नितिशा मित्रा यांनी गृह मंत्रालयाकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांनीही यात लक्ष घातले असून, योग्य उपाय करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार आता पोलिस भरतीसाठी उमेदवारांनी पोटाचा घेर अर्जात नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. योगासनांचे वर्ग व शारीरिक कवायतींना पोलिस कर्मचाऱ्यांची हजेरी अनिवार्य असेल. यासाठी पोलिस वसाहती व काही पोलिस स्थानकांमध्ये जिमची सोय करण्यात येणार आहे. जे कर्मचारी पोलिस वसाहतीत राहत नाहीत, त्यांना पोट नियंत्रणात ठेवण्यासाठी दर महिन्याला शारीरिक चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.