शपथविधीनंतरही "येडिं'वर संकट; न्यायालयात यादी सादर करावी लागणार 

political drama in karnatak
political drama in karnatak

नवी दिल्ली/बंगळूर - भाजपने कर्नाटकच्या सत्तेचा घास कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या तोंडून हिरावून घेतल्यानंतर या सत्ता शर्यतीतील घोडे गुरुवारी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाच्या दाराशी येऊन थबकले. राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्यानंतर कॉंग्रेस आणि "जेडीएस'ने न्यायालयाचे दार ठोठावले. मात्र त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. त्यामुळे येडियुरप्पांनी गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्रिपदाची औपचारिक शपथ घेतली खरी, पण त्यांनाही आता न्यायपीठासमोर भाजप समर्थक आमदारांची यादी सादर करावी लागेल. यात त्यांना अपयश आले तर मात्र त्यांचे सरकार संकटात सापडू शकते. कर्नाटकच्या "राजकल्लोळा'त सत्तासुंदरीचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

न्यायालयाकडून स्थगिती नाही 

राज्यातील राजकीय पेच लक्षात घेता गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाची दारे उघडली होती. पहाटे साडेपाच वाजेपर्यंत न्यायालयाचे कामकाज चालले. न्यायालयाने कॉंग्रेस आणि जेडीएस यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर येडियुराप्पांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला. उद्या (ता. 18) सकाळी 10.30 वाजता येडियुरप्पांना आपल्या समर्थक आमदारांची यादी सादर करावी लागणार आहे. दरम्यान, आज राजभवनामध्ये राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. "येडिं'वरील अस्थिरतेचे सावट लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याप्रमाणेच अन्य बड्या नेत्यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणे टाळले. 

विरोधकांचे आंदोलन 
राजभवानामध्ये येडियुराप्पा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असतानाच कॉंग्रेस आणि "जेडीएस'च्या आमदारांनी विधान सौधबाहेर धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉंग्रेसकडे होते. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह "जेडीएस'चे नेते आणि आमदारदेखील त्यात सहभागी झाले. अन्य दोन अपक्षही आंदोलनावेळी उपस्थित होते. पण चर्चेचा विषय ठरली ती कॉंग्रेसच्या दोन आमदारांची अनुपस्थिती. भाजपकडून फोडाफोडी होऊ नये म्हणून आंदोलनानंतर कॉंग्रेसने आपल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना "रिसॉर्ट'वर नेले. 

राहुल - शहा जुगलबंदी 
रायपूरमध्ये "जनस्वराज' संमेलनात बोलताना कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली, सध्या देशामध्ये पाकिस्तानप्रमाणेच भीतीचे वातावरण आहे. माध्यमे आणि न्यायव्यवस्थेवर हल्ले होऊ लागले आहेत. राज्यघटनेलाही धोका निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल यांच्या या आरोपांना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ट्‌विटरवरून प्रत्युत्तर दिले. कॉंग्रेसने त्यांचा आणीबाणीचा "उज्ज्वल' इतिहास आठवावा, असा टोला त्यांनी लगावला. ""केंद्र सरकार घटनात्मक संस्थांचा दुरुपयोग करत असून सरकारला देशातील लोकशाहीच नष्ट करायची आहे,'' अशी टीका "जेडीएस'चे नेते कुमारस्वामी यांनी केली. 

खेळी अंगलट 
सर्वोच्च न्यायालयात भाजपने "येडिं'च्या समर्थनार्थ मांडलेला सर्वांत मोठ्या पक्षाला संधी देण्याबाबतचा मुद्दा कॉंग्रेसने उचलून धरत गोवा, मणिपूरमध्ये आम्हालाच सरकार स्थापनेची संधी दिली जावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली. यामुळे कर्नाटकमधील खेळी अन्य राज्यांमध्ये भाजपच्या अंगलट येण्याची शक्‍यता आहे. बिहारमध्येही तेजस्वी यादव यांनीही कॉंग्रेसचीच री ओढली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com