कर्नाटकात सत्तेसाठी घोडेबाजार तेजीत

political drama in karnatak
political drama in karnatak

बंगळूर - विधानसभा निवडणुकीतील त्रिशंकू निकालानंतर कर्नाटकामध्ये सत्तेसाठी घोडेबाजार तेजीत आला आहे. भारतीय जनता पक्षाने आज राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला असताना धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस)-कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनीही राज्यपालांची भेट घेतली. या वेळी कॉंग्रेसने राज्यपालांकडे जेडीएसला पाठिंबा देत असल्याचे पत्र सादर केले. अशा परिस्थितीत राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

येडियुरप्पांचा सत्तास्थापनेचा दावा 

भाजप नेते आणि मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बी. एस. येडियुरप्पा यांनी आज राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेऊन सरकारस्थापनेचा दावा केला. भाजपने सर्वाधिक 103 जागा जिंकल्या आहेत. भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर येडियुरप्पा राजभवनमध्ये गेले आणि सर्वसहमतीने आपली निवड झाल्याचे पत्र राज्यपालांना सादर केले. येडियुरप्पा म्हणाले, की मला शक्‍य तितक्‍या लवकर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मी राज्यपालांना केली आणि राज्यपालांनीही मला लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे.

भाजपकडून पैशाचे आमिष : कुमारस्वामी 

संख्याबळ कमी असतानाही भाजपला कर्नाटकमध्ये सरकारस्थापनेची घाई झाली आहे आणि त्यासाठी ते आमच्या पक्षाच्या आमदारांना पैशाचे आमिष दाखवत आहेत आणि त्यांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. काही सदस्यांना 100 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोपही कुमारस्वामी यांनी केला. 

जेडीएस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर कुमारस्वामी यांनी केंद्रातील सत्तारूढ भाजप आपल्या ताकदीचा चुकीचा वापर करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप केला. कॉंग्रेस आणि जेडीएस आघाडीकडे 116 आमदारांच्या पाठिंब्यासह स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करताना त्यांनी, आघाडीला सरकार स्थापण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्यपालांना केली आहे. 

भाजपने जेडीएसच्या आमदारांना 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिल्याचा कुमारस्वामी यांचा आरोप काल्पनिक आहे. अपवित्र कारणांसाठी कॉंग्रेस आणि जेडीएस एकत्र आले आहेत. - प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री 

सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडे बहुमताचा आकडा नाही. अशा परिस्थितीत राज्यपाल कुणाचीही बाजू घेऊ शकत नाहीत. त्यांनी भाजप आणि संघासोबत असलेले सर्व जुने संबंध बाजूला ठेवावेत. 
- गुलाम नबी आझाद, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते 

ठळक घडामोडी 

दुपारी 12.10 : बी. एस. येडियुरप्पा यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड. राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा 
12.11 : अपक्ष आमदार आर. शंकर यांनी भाजपला पाठिंब्याची चिठ्ठी येडियुरप्पांकडे सोपविली
12.15 : एच. डी. कुमारस्वामी यांची धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड 
12.40 : घोडेबाजार करत सत्तेत येण्यासाठी भाजपकडून लाच देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा कुमारस्वामींचा आरोप. आमच्या पक्षाच्या आमदारांना फोडण्यासाठी 100 कोटी रुपये ऑफर केल्याचाही आरोप 
1.17 : भाजपचे लोक सातत्याने संपर्क साधत आहेत. मात्र, त्यांना स्पष्ट नकार दिल्याचा कॉंग्रेस आमदार टी. डी. राजेगौडा यांचा दावा 
1.55 : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कुमारस्वामींचा लाच दिली जात असल्याचा आरोप फेटाळला. 
2.05 : पंतप्रधान नरेंद्र मोदी घोडेबाजाराला चालना देत असल्याचा सिद्धरामय्या यांचा आरोप. कॉंग्रेस-जेडीएसकडे 117 आमदार असल्यामुळे सरकार स्थापण्यासाठी राज्यपालांनी आघाडी संधी देण्याचीही मागणी 
सायंकाळी 5.00 : कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली जेडीएस-कॉंग्रेस आघाडीच्या आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली. जेडीएसला पाठिंब्याचे पत्र कॉंग्रेसकडून राज्यपालांना सादर; आमदारांच्या परेडला राज्यपालांकडून नकार 
5.20 : बंगळूरमध्ये राजभवनसमोर भाजपच्या विरोधात जेडीएसच्या कार्यकर्त्यांची निदर्शने 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com