कुलभूषणच्या फाशीचा राजकीय पक्षांकडून निषेध

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतातील नौदल सेवेतील निवृत्त कमांडर अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल भारतातील सर्वच राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त करत निषेध केला आहे.

नवी दिल्ली : हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतातील नौदल सेवेतील निवृत्त कमांडर अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल भारतातील सर्वच राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त करत निषेध केला आहे.

याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते पी.एल. पुनिया म्हणाले, 'मला वाटते हे आता फार झाले आहे. भारताने थेट पाकिस्तानशी बोलावे. अलिकडेच सरबजीतचा पाकिस्तानच्या कारागृहात मृत्यू झाला होता आणि आता कुलभूषण जाधव. या प्रकारांमुळे आपण पाकिस्तानपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि पाकसोबत मर्यादित संबंध ठेवावेत याची आपल्याला पुन्हा एकदा जाणीव करून देण्यात येत आहे.' पुढे बोलताना पुनिया म्हणाले की, "जाधव यांना त्यांच्याकडील पुरावे न्यायालयात सादर करण्याची संधी मिळायला हवी. मात्र, पाकमधील दूतावासानेही जाधव यांना मदत करता येत नसल्याचे सांगितले आहे.' संयुक्‍त जनता दलाचे नेते अली अनवर यांनीही अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "अशा प्रकारांचा आम्ही निषेध करतो. भारताने सरळ भूमिका घेऊन हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळावे.'

जाधव यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्याप्रकरणी भारतामधील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना भारताने सोमवारी समन्स बजावला आहे.

Web Title: Politics urge govt to deal strictly with Pak about Kulbhushan case