'युपी'त तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरु

वृत्तसंस्था
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

तिसऱ्या टप्प्याअंतर्गत फारुखाबाद, हरदोई, कानपूर, बाराबंकी, सीतापूरसह 12 जिल्ह्यांत विस्तारलेल्या एकूण 69 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी आज (रविवार) सकाळी मतदानाला सुरवात झाली. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तिसऱ्या टप्प्याअंतर्गत फारुखाबाद, हरदोई, कानपूर, बाराबंकी, सीतापूरसह 12 जिल्ह्यांत विस्तारलेल्या एकूण 69 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा लोकसभा मतदारसंघ, समाजवादी पक्षाचा प्रभाव असलेले कन्नोज, मणिपुरी आणि इटावा या मतदारसंघांचाही समावेश आहे.

इटावा हे मुलायमसिंह यांचे मूळ गाव असून, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल कन्नोज येथून लढणार असल्याने या मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. या वेळी तब्बल 826 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. गतवेळच्या निवडणुकीत सपने येथे आपले वर्चस्व सिद्ध केले असून, एकूण 69 मतदारसंघातील 55 जागांवर सपचे उमेदवार निवडून आले होते.