"बीएसएफ'च्या सैनिक संमेलनात "पोर्नोग्राफिक क्‍लिप'

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा "अपघात' असल्याची सारवसारव केली आहे. मात्र प्रेरणादायी चित्रफीत दाखविण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याच्या लॅपटॉपवर अश्‍लील चित्रफीत असल्याचे निष्पन्न झाल्याने काळजीही व्यक्त करण्यात येत आहे

फिरोझपूर - सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) काही जवान गेल्या शनिवारी एक प्रेरणादायी चित्रफीत पाहण्याची प्रतीक्षा करत होते. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिक संमेलन या वार्षिक कार्यक्रमांतर्गत ही चित्रफीत जवानांना दाखविण्यात येणार होती. परंतु प्रेरणादायी चित्रफितीऐवजी पडद्यावर अचानक अश्‍लील चित्रफीत (पोर्नोग्राफिक व्हिडिओ) दिसू लागल्याने खळबळ उडाली. बीएसएफकडून या प्रकाराची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पंजाबमधील फिरोझपूर येथील बीएसएफच्या मुख्यालयामध्ये हा कार्यक्रम सुरु होता. अचानक पडद्यावर अश्‍लील दृश्‍ये दिसू लागल्याने या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महिला व पुरुष अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा "अपघात' असल्याची सारवसारव केली आहे. मात्र प्रेरणादायी चित्रफीत दाखविण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याच्या लॅपटॉपवर अश्‍लील चित्रफीत असल्याचे निष्पन्न झाल्याने काळजीही व्यक्त करण्यात येत आहे. ही आक्षेपार्ह चित्रफीत सुमारे पाच सेकंद दिसली होती.

""बीएसएफ हे अत्यंत शिस्तबद्ध दल असून अशा प्रकारची घटना खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींना शासन केले जाईल,'' असे बीएसएफचे प्रवक्ते व उप महासंचालक असलेल्या आर एस कटारिया यांनी सांगितले.