प्रणव मुखर्जींच्या भाषणाला उत्स्फूर्त दाद

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली- देशाच्या सर्वोच्च पदावरून आपले अखेरचे संसदीय अभिभाषण करणारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा धीरगंभीर आवाज, सरकारी योजनांच्या प्रत्येक उल्लेखासरशी सत्तारूढ बाजूने होणारा बाकांचा गजर आणि नोटाबंदी व "सर्जिकल स्ट्राइक'सारख्या मुद्द्यांवर जोरजोरात बाके वाजविणारे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी... अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या नमनाला ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये दिसलेले हे दृश्‍य. मात्र अभिभाषण संपल्यावर माजी परराष्ट्र राज्यमंत्री ई. अहमद हे सभागृहातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने कोसळल्याने सेंट्रल हॉलवर एक उदास छाया पसरली.

नवी दिल्ली- देशाच्या सर्वोच्च पदावरून आपले अखेरचे संसदीय अभिभाषण करणारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा धीरगंभीर आवाज, सरकारी योजनांच्या प्रत्येक उल्लेखासरशी सत्तारूढ बाजूने होणारा बाकांचा गजर आणि नोटाबंदी व "सर्जिकल स्ट्राइक'सारख्या मुद्द्यांवर जोरजोरात बाके वाजविणारे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी... अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या नमनाला ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये दिसलेले हे दृश्‍य. मात्र अभिभाषण संपल्यावर माजी परराष्ट्र राज्यमंत्री ई. अहमद हे सभागृहातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने कोसळल्याने सेंट्रल हॉलवर एक उदास छाया पसरली.
स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प रद्द केल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच ऐतिहासिक अधिवेशनाची सुरवात आज झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना, अर्थसंकल्पी अधिवेशन सुरळीतपणे चालण्यासाठी व लोकहिताच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी विरोधी पक्ष सरकारला सहकार्य करतील अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले, की अटलजींच्या सरकारने अर्थसंकल्प सायंकाळी पाच वाजता सादर होण्याची प्रथा बंद केली. आता रेल्वे व मुख्य अर्थसंक्‍लप एकत्रितपणे सादर होत आहे. हा एक ऐतिहिसिक प्रसंग आहे व सारे पक्ष त्याचे साक्षीदार बनले आहेत.

संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारासह राष्ट्रपतींचे आगमन होणाऱ्या क्र. 5 च्या प्रवेशद्वारावरही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी दहाच्या आधीपासूनच संसदीय कर्मचारी व सुरक्षा यंत्रणेची धावपळ सुरू होती. सुब्रह्मण्यम स्वामी, योगी आदित्यनाथ, आर. के. सिंह आदी मंडळी बाईट देण्यात मग्न होती. साडेदहाच्या सुमारास वेंकय्या नायडू प्रवेशद्वाराजवनळ आले व त्यांनी आत जाता जाता, अर्थसंकल्प अलीकडे आणण्यास विरोध करणाऱ्या विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, की अर्थसंकल्प हा संपूर्ण देशाचा असतो. त्याच्या सुरवातीच्या अभिभाषणावर तृणमूल कॉंग्रेसने बहिष्कार घालणे लोकशाही परंपरेचा अनादर आहे. नायडू यांच्या आधी काही मिनिटे आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष राबसाहेब दानवे यांनी, आपण शिवसेनेवर आज काही बोलणार नाही असे सुरवातीलाच सांगून टाकले. एका ज्येष्ठ मंत्र्यांनी आत जाता, "ते चिडले (शिवसेना) तर चिडू द्या, तुम्हीही एन्जॉय करा की,' असा शेरा मारला. मात्र आतमध्ये शिवसेना संसदीय नेते आनंदराव अडसूळ आले तेव्हा याच नेत्याने त्यांची प्रेमाने विचारपूस केल्याचेही बघायला मिळाले.
कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी पावणेअकराला येताच त्यांच्याभोवती पक्षाच्या खासदारांनी गर्दी केली. सोनिया यांनी त्यांना आपापल्या जागांवर बसण्याची सूचना केली. त्या पाठोपाठ आलेले भाजप नेते लालकृष्ण अडवानी नेहमीच्या मुद्रेत सोनिया यांच्याशेजारील आसनावर जाऊन बसले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग येताच अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह भाजप नेत्यांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले.

अभी तो बहोत कुछ तोडना है !
अभिभाषणानंतर सेंट्रल हॉलमध्ये काही विरोधी पक्षीय खासदारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोरजोरात बाके वाजविण्याच्या उत्साहाची चर्चा सुरू होती. त्याच वेळी राष्ट्रपतींना निरोप देऊन माघारी येणारे पंतप्रधान या खासदारांसमोर आले. कॉंग्रेसच्या राज्यसभेतील एक वरिष्ठ नेते त्यांना म्हणाले, की मोदीजी आज तुम्ही इतक्‍या जोरात बाक वाजवताना दिसलात की बाक तुटेल की काय असे आम्हाला वाटले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हा शेरा ऐकताच मोदी लालेलाल झाले. त्यांनी ताडकन, "अभि तो बहोत कुछ तोडना बाकी है,' असे प्रत्युत्तर दिले व ते पुढे गेले. सेंट्रल हॉलमध्ये या रंजक घटनेची चर्चा आज दिवसभर होती.