मोदींनी अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली : मुखर्जी

पीटीआय
शनिवार, 27 मे 2017

कदाचित पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारख्या अन्य माजी पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने सरकारच्या लोकशाही पद्धतीत त्यांची धोरणे, त्यांच्या कल्पना राबविल्या, तसेच एका धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचा स्वीकार केला त्याच्याशी त्यांची तुलना होऊ शकते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांत प्रभावी संवादकांपैकी एक असून, त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी स्तुती केली.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडी) सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका पुस्तकाचे प्रकाशन करताना मुखर्जी म्हणाले, की मोदी यांनी विविध उपक्रम राबविले असून, त्यांच्या काही निर्णयांमुळे एका काळाची निर्मिती झाली आहे. समकालीन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभावी संवादकांपैकी एक आहेत, यामध्ये शंकाच नाही आणि कदाचित पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारख्या अन्य माजी पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने सरकारच्या लोकशाही पद्धतीत त्यांची धोरणे, त्यांच्या कल्पना राबविल्या, तसेच एका धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचा स्वीकार केला त्याच्याशी त्यांची तुलना होऊ शकते.

चांगल्या संवादकाची क्षमता नसेल तर कोट्यवधी लोकांचे नेतृत्व करता येऊ शकत नाही, असे नमूद करून सरकारविषयी बोलताना मुखर्जी म्हणाले, वेगवेगळ्या दिशेने भारतात अनेक महत्त्वाचे विकासाचे उपक्रम राबविले गेले आहेत आणि अर्थव्यवस्थेचा पाया भक्‍कम करण्यात आल्यामुळे हे शक्‍य झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्था स्थिरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. पंतप्रधानांनी एक नवी दिशा दिली आहे, यात शंकाच नाही.