डॉक्‍टरांवरील हल्ले अस्वीकार्य - प्रणव मुखर्जी

पीटीआय
शुक्रवार, 19 मे 2017

रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाची मोडतोड, डॉक्‍टरांना मारहाण अशा घटना थांबल्या पाहिजेत. उत्तम आरोग्य व्यवस्थेसाठी हे महत्त्वाचे असून, रुग्णाबरोबर त्याच्या नातेवाइकांवरही काही जबाबदाऱ्या आहेत

कोलकता - रुग्णांच्या नातेवाइकांडून डॉक्‍टरांवर होणारे हल्ले अस्वीकार्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज केले. उत्तम आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपल्यावर काही जबाबदाऱ्या आहेत, हे त्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे असल्याचेही मुखर्जी यांनी नमूद केले आहे.

सोनारपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड डायडेस्टिव्ह सायन्सच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. मुखर्जी म्हणाले, ""रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाची मोडतोड, डॉक्‍टरांना मारहाण अशा घटना थांबल्या पाहिजेत. उत्तम आरोग्य व्यवस्थेसाठी हे महत्त्वाचे असून, रुग्णाबरोबर त्याच्या नातेवाइकांवरही काही जबाबदाऱ्या आहेत.''

डॉक्‍टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांना सेवा देताना हसतमुख राहणे गरजेचे आहे. चेहऱ्यावरील हास्य हजारोंसाठी दिलासादायक असते. असेही मुखर्जी म्हणाले. राज्यात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅंनर्जी यांनी केलेल्या प्रयत्नांचे मुखर्जी यांनी कौतुक केले.

फेब्रुवारी महिन्यात ममता बॅनर्जी यांनी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची भेट घेत गरीब रुग्णांची पिळवणूक थांबविण्याचे आवाहन केले होते. वैद्यकीय सेवेत पारदर्शकता आणणे, रुग्णांची पिळवणूक थांबवणे, या संदर्भात एका विधेयकास राज्य सरकारने मंजुरी देत गरीब रुग्णांना दिलासा दिला होता.