राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी डाव्यांतर्फे गोपालकृष्ण गांधींचा आग्रह

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 जून 2017

नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या आगामी निवडणुकीसाठी विरोधी पक्षांतर्फे संयुक्त उमेदवार शोधण्याच्या मोहिमेत गोपालकृष्ण गांधी यांचे नाव डाव्या पक्षांतर्फे आग्रहपूर्वक पुढे केले जात आहे; मात्र अद्याप त्या नावावर सर्वसंमती झालेली नसल्याचे समजते. संयुक्त जनता दलाचे नेते व वरिष्ठ संसदपटू शरद यादव यांच्या नावाचीही चर्चा आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या आगामी निवडणुकीसाठी विरोधी पक्षांतर्फे संयुक्त उमेदवार शोधण्याच्या मोहिमेत गोपालकृष्ण गांधी यांचे नाव डाव्या पक्षांतर्फे आग्रहपूर्वक पुढे केले जात आहे; मात्र अद्याप त्या नावावर सर्वसंमती झालेली नसल्याचे समजते. संयुक्त जनता दलाचे नेते व वरिष्ठ संसदपटू शरद यादव यांच्या नावाचीही चर्चा आहे.

विरोधी पक्षांतर्फे संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वांत मोठा विरोधी पक्ष या नात्याने कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत पुढाकार घेऊन सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चेच्या दोन फेऱ्या केल्या. या फेऱ्यांनंतर विरोधी पक्षांच्या संभाव्य संयुक्त उमेदवाराचा शोध, त्याच्या नावावर सर्वसंमती यावर कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यामध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षांच्या वर्तुळातून देण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव, कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद आदींचा समावेश आहे; मात्र या कामासाठी एक औपचारिक समिती किंवा गट नेमल्याचा इन्कार पवार यांनी कालच केला होता. असे असले तरी सर्वांत अनुभवी व वरिष्ठ या नात्याने पवार या समन्वय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगितले जाते.

या संदर्भातच काल रात्री येचुरी आणि पवार यांची भेट झाली आणि दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या वेळापत्रकाच्या काल झालेल्या घोषणेच्या संदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याचे समजते. डाव्या पक्षांतर्फे महात्मा गांधी यांचे नातू व पश्‍चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांचे नाव आग्रहपूर्वक पुढे करण्यात येत असल्याचे समजले. असे असले तरी विरोधी पक्ष अद्याप आपले पत्ते खुले करण्यास तयार नाही. भाजपने आणि सरकारनेही राष्ट्रपतिपदाच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात विरोधी पक्षांबरोबर चर्चा करण्यात येईल, असे जाहीर केलेले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच राष्ट्रपतिपदाच्या संभाव्य उमेदवाराबाबत सर्वसंमती निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकार विरोधी पक्षांशी संपर्क करणार असल्याचे सांगितले होते. त्याच्या प्रतीक्षेत विरोधी पक्ष आहेत.

भाजपला पाठिंबा नाहीच
सत्तारूढ भाजपतर्फे राष्ट्रपतिपदासाठीच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणतेही नाव पुढे करण्यात आलेले नाही; परंतु भाजपच्या संभाव्य उमेदवाराला पाठिंबा देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवणार नाही, अशी डाव्या पक्षांची भूमिका आहे आणि त्यामुळेच गोपालकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीबाबत ते आग्रही आहेत. एका नेत्याने काहीसे विनोदाने बोलताना म्हटले, की असे झाल्यास "गोडसे (भाजप उमेदवार) विरुद्ध गांधी' हेच प्रचाराचे मुख्य सूत्र राहील.