कोण आहेत रामनाथ कोविंद? 

टीम ई सकाळ
सोमवार, 19 जून 2017

राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद

कारकिर्दीच्या सुरवातीलाच रामनाथ कोविंद यांना 1977 मध्ये जनता पक्षाचे सरकार आले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे स्वीय सहायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यातील डेरापूर तालुक्यामधील परौंख या छोट्या खेड्यात जन्म झालेले रामनाथ कोविंद यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे कानपूर येथे कायद्याचे शिक्षण घेऊन दिल्लीमध्ये राहून IAS बनण्यासाठी UPSCची तयारी केली. तिसऱ्या प्रयत्नात ते ही परीक्षा पास झाले. मात्र, मुख्य सेवेत संधी न मिळाल्याने त्यांनी या नोकरीवर पाणी सोडले.

त्यांनी वकील म्हणून कारकिर्दीला सुरवात केली. दरम्यान, आणीबाणीनंतर जून 1975 मध्ये केंद्रात जनता पक्षाचे सरकार आल्यावर रामनाथ कोविंद हे तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांची स्वीय सहायक झाले. त्यानंतर कारकिर्दीच्या सुरवातीलाच त्यांना 1977 मध्ये जनता पक्षाचे सरकार आले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे स्वीय सहायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संपर्कात आले. दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात एकूण 16 वर्षे त्यांनी सरकारी वकील म्हणून काम केले.

ते 1994 मध्ये उत्तर प्रदेशातून प्रथम राज्यसभेत खासदार म्हणून निवडून गेले. सलग दोनवेळा म्हणजे एकूण 12 वर्षे ते राज्यसभेत खासदार राहिले. त्यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी 2007 मध्ये भोगनीपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली. मात्र, ते पराभूत झाले. 
बिहारच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्रातील भाजप सरकारने दलित चेहरा म्हणून रामनाथ कोविंद यांची राज्यपालपदी निवड केली अशी चर्चा त्यावेळी होती. नितीश कुमार हे या निवडीबद्दल नाखूश होते. भाजपच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष, तसेच अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष ही पदेही कोविंद यांनी भूषवली आहेत.  

आता राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत अनेक नावांची चर्चा झाल्यानंतर अनपेक्षितपणे भाजपने रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. 

जन्म : 1 ऑक्टोबर 1945 
शिक्षण : बी.कॉम., L.L.B. (कानपूर विद्यापीठ, उत्तर प्रदेश)
पत्नी : सविता कोविंद (30 मे 1974 रोजी विवाहबद्ध)
अपत्ये : मुलगा- प्रशांत कुमार (विवाहित), आणि मुलगी- स्वाती
सध्या निवास : राजभवन, पाटणा, बिहार

1971 : दिल्ली बार काउन्सिलचे सदस्य
1977 : पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे स्वीय सहायक
1977 ते 1979 : दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील
1980 ते 1993 : सर्वोच्च न्यायालयात सरकारचे वकील
1990 : घाटमपूर येथून लोकसभा निवडणूक पराभूत
1994 ते 2006 : राज्यसभेचे दोनदा सदस्य
2007 : भोगनीपूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत

2015 पर्यंत : उत्तर प्रदेश भाजपचे महामंत्री
2015 : बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

संसदेतील अनुसूचित जाती-जमाती समिती, गृह खाते, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, सामाजिक न्याय, विधि व न्याय, तसेच राज्यसभा सभागृह समिती अशा विविध समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. कुटुंबात तीन भावांमध्ये सर्वांत धाकटे असणाऱ्या रामनाथ यांनी आपल्या परौख या गावातील वडिलोपार्जित घर धर्मशाळेसाठी दान केले आहे.