राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात सीताराम येचुरी-सोनिया गांधींची भेट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्युरी यांनी गुरूवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या निवडणुकीसाठी सर्व विरोधक एकत्र येण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्युरी यांनी गुरूवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या निवडणुकीसाठी सर्व विरोधक एकत्र येण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

विरोधकांनी एकत्र येऊन राष्ट्रपतीपदासाठी एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय येचुरी यांनी यापूर्वीच घेतला आहे. गुरुवारीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही गांधी यांची भेट घेतली. यावेळी विरोधकांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याविषयी चर्चा झाली. त्यामुळे विरोधक एकत्र येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना उमेदवारी देण्याविषयी "सामना'तील अग्रलेखातून चर्चा करण्यात आली होती. तसेच भागवत यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचा पाठिंबा असल्याचेही म्हटले होते. त्यानंतर भागवत यांनी आपण राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले होते.

विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत आहे. ते 25 जुलै 2012 रोजी राष्ट्रपतीपदावर विराजमान झाले होते. त्यावेळी मुखर्जी यांच्या विरोधात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वतीने पी. ए. संगमा हे उभे होते. मात्र त्यांचा पराभव झाला होता. मुखर्जी यांना 7 लाख 13 हजार 763 तर संगमा यांना 3 लाख 15 हजार 987 मते मिळाली होती.