हवाई चप्पल घालणारेही विमानात दिसायला हवेत : मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

अशी आहे योजना
'उडान' योजनेंतर्गत 70 ते 90 आसनी छोट्या विमानांतील 50 आसने 2500 रुपये तिकीट देऊन खरेदी करता येतील व त्यानंतरच्या प्रवाशांना नेहमीच्या दराने तिकिटे घ्यावी लागतील. म्हणजेच एका दृष्टीने ही सेवा 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह,' या तत्त्वावरच असेल.

सिमला : स्वस्त दरातील विमान प्रवासाच्या 'उडान' योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) उद्‌घाटन केले. हवाई चप्पल घालणारेही विमान प्रवासात करत असल्याचे स्वप्न पाहत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

'उडान' योजनेतील शिमला-दिल्ली दरम्यानच्या पहिल्या विमान सेवेचे आज उद्‌घाटन झाले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, 'आपल्या देशात हवाई वाहतूकीचे धोरण नाही. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आमच्या सरकारला सर्वात प्रथम हवाई धोरण तयार करण्याचे सौभाग्य मिळाले. नव्या धोरणानुसार हवाई प्रवासाचा खर्च प्रतिकिलोमीटर केवळ 6 ते 7 रुपये होईल. या धोरणानंतर टॅक्‍सी प्रवासापेक्षा विमान प्रवास अधिक स्वस्त होणार आहे. देशात अशा अनेक धावपट्ट्या आहेत की ज्यांचा वापर केला जात नाही.'

अत्यल्प वेळेत देशातील लोकांना परस्परांशी जोडणाऱ्या या महत्वाकांक्षी योजनेबद्दल नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या. 'छोट्या शहरातील सामान्य नागरिकांना स्वस्त दरातील हवाई प्रवास उपलब्ध करून देणे हे 'उडान' योजनेचे उद्दिष्ट आहे. हवाई चप्पल घालणारेही विमान प्रवास करत असल्याचे स्वप्न मी पाहत आहे', असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

अशी आहे योजना
'उडान' योजनेंतर्गत 70 ते 90 आसनी छोट्या विमानांतील 50 आसने 2500 रुपये तिकीट देऊन खरेदी करता येतील व त्यानंतरच्या प्रवाशांना नेहमीच्या दराने तिकिटे घ्यावी लागतील. म्हणजेच एका दृष्टीने ही सेवा 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह,' या तत्त्वावरच असेल.