पंतप्रधानांच्या भाषणावर सरन्यायाधीश नाराज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

न्यायमूर्तींच्या नियुक्तीच्या मुद्द्याला स्पर्श न केल्याने असमाधानी

न्यायमूर्तींच्या नियुक्तीच्या मुद्द्याला स्पर्श न केल्याने असमाधानी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त सोमवारी (ता.15) राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात न्यायमूर्तींच्या नियुक्तीच्या मुद्द्याला स्पर्शही न केल्याबद्दल सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. उच्च न्यायालयांतील मुख्य न्यायमूर्ती; तसेच न्यायधीशांची नियुक्ती व बदल्यांसाठी कॉलेजियमच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याबद्दल सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारवर नुकत्याच कडक शब्दांत ओढलेल्या ताशेऱ्यांच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

पंतप्रधानांचे भाषण मी सुमारे दीड तास ऐकले. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. त्यात न्यायमूर्तींच्या नियुक्तीचाही अंतर्भाव असेल, अशी माझी अपेक्षा होती. मी पंतप्रधानांना केवळ एक गोष्ट सांगू इच्छितो, की तुम्ही गरिबी हटवा, नव्या रोजगारांची निर्मिती करा; तसेच नव्या योजना आणा; पण त्याचबरोबर देशातील नागरिकांना न्याय मिळावा, याबाबतही विचार करा, असे ठाकूर म्हणाले. एका कार्यक्रमात ते बोलत होते. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद हेही या वेळी उपस्थित होते.

सरन्यायाधीश म्हणाले, न्यायालयांवरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे जलदगतीने खटले निकाली काढणे कठीण होत आहे. ब्रिटिशांच्या काळात 10 वर्षांत खटले निकाली निघत असत. पण आता खटल्यांची संख्या आणि लोकांची अपेक्षा अत्यंत वेगाने वाढत आहे. त्यामुळे लक्ष्य गाठणे कठीण बाब ठरत आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती मी पंतप्रधानांना करतो. मी कारकिर्दीच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचलो असल्याने; तसेच आयुष्यात मला आणखी कशाचीही अपेक्षा नसल्याने कोणतीही भीड न बाळगता मी ‘स्पष्टपणे‘ सत्य बोलू शकतो, असेही ते म्हणाले.

काही आमच्यासाठीही करा...
आपल्या मुद्द्यावर जोर देण्यासाठी सरन्यायाधीशांनी या वेळी "गुल फेंकें औरोंपर, समर भी, ई अब्र- ए-करम-ए-बेहर-ए-सखा, कुछ तो इधर भी‘ ( तुम्ही इतरांना फळ-फुले द्या. पण काही परोपकार, मैत्रीचा वर्षाव, काही दानधर्म आमच्यासाठीही करा) हा उर्दू शेरही ऐकवला.