'यूपी'तील तुरुंगात कैद्यांचा धुडगूस 

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

म्हणून कैदी संतप्त झाले 
फतेहगड तुरुंगातील कैद्यांवर उपचार करणारे कारागृह चिकित्सक डॉ. नीरज बेकायदेशीररीत्या कैद्यांकडून रक्कम घेत असत, असा आरोप कैद्यांनी केला आहे. पैसे घेऊनही ते कैद्यांवर योग्य उपचार करत नसत. उपचाराअभावी कैद्यांना त्रास सहन करावा लागत असे. यामुळे कैद्यांनी डॉ. नीरज यांच्या निलंबनाची मागणी केली. तुरुंग प्रशासनाने तातडीने नीरज यांना काढून टाकले आहे. 

फारूखाबाद - उत्तर प्रदेशमधील फतेहगड येथील तुरुंगामध्ये कैद्यांनी गोंधळ घालत तुरुंग प्रशासनाला जेरीस आणले. कैद्यांनी घातलेल्या गोंधळामध्ये जिल्हा दंडाधिकारी आणि तुरुंग अधीक्षक यांच्यासोबत इतर कर्मचारीही जखमी झाले. कैदी साथीदाराला उपचार न मिळाल्याने कैद्यांनी धुडगूस घातल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

फतेहगड तुरुंगातील आजारी कैद्याला वेळेवर उपचार मिळत नसल्याने कैदी नाराज होते. याचाच राग मनात धरून कैद्यांनी तुरुंगामध्ये अक्षरश: धुडगूस घालत स्वयंपाकघराला आग लावली. तसेच तुरुंगातील कर्मचाऱ्यांवर हल्ले केले. या हल्ल्यामध्ये प्रभारी जिल्हा दंडाधिकारी एन .पी. पांडे, तुरुंग अधीक्षक राजेश वर्मा, मुख्य विकास अधिकारी नरेंद्र पांडे यांच्याह अन्य तुरुंगरक्षक जखमी झाले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे कारागृह राज्यमंत्री जयकुमार यांनी तुरुंगाला भेट दिली. या वेळी जयकुमार यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. 

रविवारी सकाळी आजारी कैद्याची प्रकृती गंभीर असतानाही उपचार मिळत नसल्याने कैदी संतप्त झाले होते. या वेळी कैद्यांनी तुरुंग अधीक्षकांसमोरच निषेध व्यक्त केला. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. संतप्त कैद्यांनी आग लावून तुरुंगरक्षकांवरही हल्ला चढविला. याचबरोबर तुरुंगाच्या छतावर जाऊन दगडफेकही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रभारी जिल्हा दंडाधिकारी एन. पी. पांडे तुरुंगामध्ये गेले; मात्र कैद्यांनी त्यांनाही जुमानले नाही. कैद्यांच्या हल्ल्यामध्ये पांडेही जखमी झाले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैद्यांनी फारुखाबादच्या पोलिस अधीक्षकांवरही दगडफेक केली. यात ते बालंबाल बचावले. यानंतर तरुंगक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा बोलावण्यात आला. 

कैद्यांच्या धुडगुसानंतर राज्याच्या पोलिस उपमहासंचालकांनी तुरुंगातील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच कैद्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. कैदी धुडगूस प्रकरण अनेक अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. या वेळी प्राथमिक कारवाईमध्ये तरुंगरक्षक धर्मपाल सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. सिंह यांच्यासह आणखी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

म्हणून कैदी संतप्त झाले 
फतेहगड तुरुंगातील कैद्यांवर उपचार करणारे कारागृह चिकित्सक डॉ. नीरज बेकायदेशीररीत्या कैद्यांकडून रक्कम घेत असत, असा आरोप कैद्यांनी केला आहे. पैसे घेऊनही ते कैद्यांवर योग्य उपचार करत नसत. उपचाराअभावी कैद्यांना त्रास सहन करावा लागत असे. यामुळे कैद्यांनी डॉ. नीरज यांच्या निलंबनाची मागणी केली. तुरुंग प्रशासनाने तातडीने नीरज यांना काढून टाकले आहे.