प्रियांकांबाबतची बातमी ही "फेक न्यूज' - कॉंग्रेस

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला उद्देशून करावयाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा पोकळ आश्‍वासने देण्याऐवजी यापूर्वीच्या आश्‍वासनांच्या पूर्ततेचा हिशेब जनतेला द्यावा.
- आनंद शर्मा, कॉंग्रेसचे नेते

नवी दिल्ली - प्रियांका गांधींना कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्षपद बनविण्याची पक्षाध्यक्ष सोनिया गांधींनी तयारी चालविली असल्याच्या कथित बातमीवर कॉंग्रेस पक्षाने "ही फेक न्यूज आहे', अशी प्रतिक्रिया दिली आणि तथ्यहीन माहिती प्रसारमाध्यमांमध्ये पेरून मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा आणि वावड्या उठविण्याचा हा सरकारचा डाव आहे, असा आरोपही केला.

कॉंग्रेसच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधींनी पक्षातील नेतृत्वबदलाचे आणि प्रियांका गांधींना कार्यकारी अध्यक्ष बनविण्याचे संकेत दिले, अशी बातमी कॉंग्रेसमधील कार्यकारिणी सदस्याच्या हवाल्याने एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली. प्रियांका गांधींच्या राजकारण प्रवेशाबाबत एरव्ही प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवर खुलासे किंवा प्रतिक्रिया टाळणाऱ्या कॉंग्रेसने आज मात्र, राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या बातमीवर तडकाफडकी आक्रमक प्रतिक्रिया दिली.

केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी तर या बातमीमागे सरकारचा डाव असल्याचा दावा करताना "प्रसारमाध्यमांनी पेरलेल्या बातम्यांच्या सापळ्यात अडकू नये', असे बजावले. ते म्हणाले, सरकारकडून वाटेल तशा बातम्या पेरल्या जात आहेत. वास्तविक मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी खालच्या पातळीवरील ही खेळी आहे. कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही "संबंधित बातमी पूर्णपणे असत्य आणि निराधार असून, "फेक न्यूज'द्वारे वावड्या उठविण्याचा हा प्रकार आहे, अशी टिप्पणी केली.

स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला उद्देशून करावयाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा पोकळ आश्‍वासने देण्याऐवजी यापूर्वीच्या आश्‍वासनांच्या पूर्ततेचा हिशेब जनतेला द्यावा.
- आनंद शर्मा, कॉंग्रेसचे नेते