नायजेरियन विद्यार्थ्यांवर जमावाचा हल्ला; 3 जखमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणाचा निषेध नोंदविणाऱ्या जमावाने नायजेरियन विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे. त्यामध्ये तीन नायजेरियन विद्यार्थी जखमी झाले आहेत. या प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सखोल चौकशीचे आश्‍वासन दिले आहे.

ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) : बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणाचा निषेध नोंदविणाऱ्या जमावाने नायजेरियन विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यामध्ये तीन नायजेरियन विद्यार्थी जखमी झाले आहेत. या प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सखोल चौकशीचे आश्‍वासन दिले आहे.

मनिष खारी या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे हृदयविकाराच्या झटक्‍याने नुकतेच निधन झाले. ड्रग्जच्या अतिसेवनाने त्याचा मृत्यू झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. मनिषला परिसरात राहणाऱ्या नायजेरियन विद्यार्थ्यांनी ड्रग्ज दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी पाच नायजेरियन विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी स्थानिकांचा जमाव सोमवारी एकत्र आला होता. दरम्यान एका दुकानात खरेदी करणाऱ्या नायजेरियन विद्यार्थ्यांना पाहून जमाव हिंसक बनला आणि जमावाने विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन नायजेरियन विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी सात स्थानिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबत त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. 'मी ग्रेटर नोएडामध्ये आफ्रिकन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी योगी आदित्यनाथजी यांच्याशी चर्चा केली आहे. या दुर्दैवी प्रकरणाची स्वच्छ आणि नि:ष्पक्षपातपणे चौकशी करण्यात येईल, अशी खात्री त्यांनी दिली आहे', अशी माहिती स्वराज यांनी दिली आहे.

'आम्ही आजूबाजूच्या नागरिकांना मदतीसाठी याचना केली. मात्र कोणीही पोलिसांना बोलाविले नाही. अगदी आमच्या महाविद्यालयानेही मदत केली नाही. 'ते आम्हाला का मारत होते ते आम्हाला समजले नाही. काठ्या, विटा आणि चाकूने त्यांनी आम्हाला मारले', अशा प्रतिक्रिया पीडित विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे.