आधीच सांगितलं होतं.. नोटाबंदी महागात पडेल..!: रघुराम राजन

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नोटाबंदी निर्णयानंतर तात्काळ होणाऱ्या नुकसानीची आणि भविष्यात होणाऱ्या फायद्याबाबतची कल्पना मी सरकारला दिली होती. फेब्रुवारी 2016 मध्ये याबाबतच्या तोंडी सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतर एक पत्रही दिले होते. नोटाबंदी करण्यापूर्वी आवश्यक ती तयारी करण्यात आली नव्हती.

नवी दिल्ली - नोटाबंदीचा निर्णय महागात पडेल, याची कल्पना मी सरकारला आगोदरच दिली होती. तसेच काळापैसा व्यवहारात आणण्यासाठी अन्य काही पर्याय सुचविल्याचा खुलासा वक्तव्य रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला आहे.

नोटाबंदीनंतर रद्द ठरविलेल्या पाचशे आणि हजार रूपयांच्या एकूण नोटांपैकी 99 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात जाहीर केले. रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) अंदाजानुसार, एकूण 15.28 लाख रूपये किंमतीच्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा 30 जून 2017 अखेर बँकांमध्ये परद आल्या आहेत. नोटाबंदीपूर्वी 15.40 लाख कोटी ते 15.50 लाख कोटी रूपये किंमतीच्या पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनात होता, असा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर राघुराम राजन यांनी हा खुलासा केला आहे.

रघुराम राजन यांचे पुढील आठवड्यात 'I Do What I Do: On Reforms Rhetoric and Resolve' पुस्तक प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात त्यांनी नोटाबंदीबाबत लिहिले आहे. रघुराम राजन यांचा कार्यकाळ 5 सप्टेंबर 2016 मध्ये संपला होता. त्यानंतर 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आली होती. 

रघुराम राजन यांनी लिहिले आहे, की नोटाबंदी निर्णयानंतर तात्काळ होणाऱ्या नुकसानीची आणि भविष्यात होणाऱ्या फायद्याबाबतची कल्पना मी सरकारला दिली होती. फेब्रुवारी 2016 मध्ये याबाबतच्या तोंडी सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतर एक पत्रही दिले होते. नोटाबंदी करण्यापूर्वी आवश्यक ती तयारी करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याचा फटका किती बसू शकतो, हे सांगितले होते. नोटाबंदीच्या निर्णयाचा देशातील गरिबांना मोठा फटका बसला आहे.