भाजपशासित राज्यांमध्ये अनागोंदी : राहुल गांधी

पीटीआय
मंगळवार, 23 मे 2017

राजस्थानपासून उत्तर प्रदेश, हरियाना आणि आता झारखंड या भाजपशासित राज्यांमध्ये अनागोंदी आणि अनैतिकता माजली आहे. पंतप्रधान उत्तर देतील का?

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये गावकऱ्यांनी सहा लोकांची हत्या केल्याच्या घटनेवरून चिंता व्यक्त करताना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपशासित राज्यांमध्ये अनागोंदी आणि अनैतिकता माजल्याची टीका केली.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
राजस्थानपासून उत्तर प्रदेश, हरियाना आणि आता झारखंड या भाजपशासित राज्यांमध्ये अनागोंदी आणि अनैतिकता माजली आहे. पंतप्रधान उत्तर देतील का?, अशी विचारणा राहुल यांनी एका ट्विटद्वारे केलीे.

झारखंडमधील सेरायकेला-खारस्वान जिल्ह्यात 18 मे रोजी मुलांचे अपहरण केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांना सहा लोकांची हत्या केली होती. या घटनेनंतर कॉंग्रेसने देशातील, विशेषत: जम्मू-काश्‍मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप करत मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. गोरक्षाच्या नावाखाली देशभरातील भाजप कार्यकर्ते हिंसाचारात सहभागी होत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.