दिवाळीनंतर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष 

वृत्तसंस्था
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे दिवाळीनंतर कधीही पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील. विधानसभा निवडणुका असलेल्या गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड ही राज्ये वगळता अन्य सर्व राज्यांतील काँग्रेसच्या संघटनात्मक निवडी कोणत्याही निवडणुकीविना झाल्या आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधी यांच्यावर लवकरच सोपविण्यात येईल, असे सूतोवाच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी केले. 

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या "द कोएलिशन इयर्स 1996-2012' या आत्मचरित्राचे प्रकाशन आज झाले. या कार्यक्रमात प्रसारमाध्यांशी बोलताना सोनिया गांधी यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राहुल गांधी मात्र यावर काही बोलले नाहीत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या संपत्तीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. जय शहा कधी सूत्रे स्वीकारणार, असा उलटा प्रश्‍न त्यांनी केला. 

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे दिवाळीनंतर कधीही पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील. विधानसभा निवडणुका असलेल्या गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड ही राज्ये वगळता अन्य सर्व राज्यांतील काँग्रेसच्या संघटनात्मक निवडी कोणत्याही निवडणुकीविना झाल्या आहेत. या राज्यांनी राहुल गांधी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करावी, असे ठराव बिनविरोध मंजूर केले आहेत. यामध्ये पहिला क्रमांक दिल्ली राज्याने पटकावला होता.