"राहुल हुतात्म्याचा मुलगा; तो घाबरत नाही"

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

गुजरातमध्ये पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी राहुल गांधी गेले असताना शुक्रवारी बनासकांठा येथे त्यांच्यावर दगडफेक झाली होती. 

नवी दिल्ली : "गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे सदस्य आज आक्रमक झाले. "राहुल यांच्यावर करण्यात आलेला हल्ला दुर्दैवी आहे. परंतु राहुल असल्या हल्ल्यांना घाबरणार नाही, तो हुतात्म्याचा मुलगा आहे," असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारवर टीका करताना खर्गे म्हणाले, "एकीकडे हे गोळ्या झाडून लोकांचा जीव घेतात. येथे तर दगडफेक करून राहुल गांधींचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहेत." 

गुजरातमध्ये पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी राहुल गांधी गेले असताना शुक्रवारी बनासकांठा येथे त्यांच्यावर दगडफेक झाली होती. 
भाजपच्या एका नेत्याच्या विधानाचा संदर्भ देत खर्गे म्हणाले की, काश्मीरमध्ये जी दगडफेक होते ती दहशतवादी करत आहेत, असे भाजप आणि सरकारच्या वतीने सांगण्यात आले. आता गुजरातमध्ये कोणते दहशतवादी आले आहेत? ते जम्मू-काश्मीरमधून आले आहेत काय? की भाजपचे कार्यकर्ते दहशतवादी बनून राहुल गांधी यांचा जीव घेऊ पाहत आहेत, असा सवाल खर्गे यांनी संसदेत उपस्थित केला.

खर्गे यांच्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले, "राहुल गांधी यांनी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी जाणीवपूर्वक स्वतःला दगडफेकीत ढकलले. ते ज्या ठिकाणी थांबले होते तिथे त्यांचा कोणताही कार्यक्रम नव्हता. गुजरात राज्य सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि एका आरोपीला पकडण्यातही आले आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या स्वीय सहायकाचे ऐकले, पण विशेष सुरक्षा गटाचे ऐकले नाही. ते बुलेटप्रूफ गाडीऐवजी पक्षाच्या गाडीने गेले."
दरम्यान, कोणावरही दगडफेक केली जाणे चुकीचे आहे असे सांगत राजनाथ यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. 
 

Web Title: rahul gandhi martyr's son mallikarjun kharge