सरकार न्यायालयालाही देशद्रोही ठरविणार का?- राहुल

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

सरकारने नोटा बदलून घेण्याची मर्यादा आता साडेचार हजारांवरून दोन हजार केली आहे. देशातील परिस्थिती गंभीर असून यामुळे दंगली देखील भडकू शकतात, अशा शब्दांत न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. 

नवी दिल्ली - नोटबंदीच्या निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयाने देशात दंगली घडतील अशी शक्यता वर्तविल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आता केंद्र सरकार न्यायालयालाही देशद्रोही ठरविणार का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

केंद्रातील भाजप सरकारककडून नोटबंदीला या निर्णयाला समर्थन करण्यासाठी देशप्रेमाचा आधार घेण्यात येत आहे. तसेच काँग्रेसच्या नेत्यांना देशद्रोही असे संबोधले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेताना देशाकडे 50 दिवसांचा अवधी मागितला आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्याने बँकांबाहेर आणि एटीएमबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. देशभरात आतापर्यंत नोटा बदलण्यासाठी व नोटा भरण्यासाठी बँकांबाहेर थांबलेल्या 55 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सरकारला घेरत प्रश्न उपस्थित केला आहे. देशभरातील बॅंका आणि पोस्ट कार्यालयांच्या बाहेरील लोकांच्या रांगा ही चिंतेची बाब आहे. अनेकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून त्यावरून त्यांना नेमका काय त्रास सहन करावा लागत असेल याची कल्पना येऊ शकते. सरकारने नोटा बदलून घेण्याची मर्यादा आता साडेचार हजारांवरून दोन हजार केली आहे. देशातील परिस्थिती गंभीर असून यामुळे दंगली देखील भडकू शकतात, अशा शब्दांत न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती.