राहुल गांधींच्या भाषणाचा 'तो' व्हिडिओ ट्विटरवरून डिलिट

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जुलै 2018

मोदी सरकारविरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यासाठी मतदान घेण्यात आले होते. त्यादरम्यान राहुल गांधी यांनी आक्रमकपणे भाषण करून मोदी सरकारला धारेवर धरले होते. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेटी घेतली होती.

नवी दिल्ली : 'काँग्रेस वर्किंग कमिटी'ची (सीडब्ल्यूसी) बैठक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दिल्ली येथे पार पडली. त्यावेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपवर टीकास्त्र सोडले होते. या व्हिडिओवरून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने अखेर भाषणाचा 'तो' व्हिडिओ ट्विटरवरून डिलिट केला. 

मोदी सरकारविरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यासाठी मतदान घेण्यात आले होते. त्यादरम्यान राहुल गांधी यांनी आक्रमकपणे भाषण करून मोदी सरकारला धारेवर धरले होते. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेटी घेतली होती. त्यानंतर त्यांच्या भाषणाची आणि गळाभेटीची चर्चा सगळीकडे होत असताना आता मात्र, राहुल गांधींचा सीडब्ल्यूसीच्या बैठकीतील तो व्हिडिओ डिलिट करावा लागला आहे.

सीडब्ल्यूसीच्या बैठकीत राहुल गांधी म्हणाले होते, की ''भाजपची सरकारे राज्यांच्या तिजोरीतील पैसे चोरून आरएसएसशी संबंधित संस्थांना देत आहेत. तसेच भाजप जेव्हा सत्तेत येते. तेव्हा संबंधित राज्यातील संघाच्या हजारो संस्थांना नवचैतन्य येते''. 

दरम्यान, राहुल गांधी यांच्या या भाषणाचा व्हिडिओ काँग्रेसने यू-ट्यूब आणि ट्विटरवर अपलोड केला होता. मात्र, त्यातील आरोप ऐकून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर आक्षेप घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही सर्व शक्यता लक्षात घेता अखेर 'तो' व्हिडिओ काँग्रेसला डिलिट करावा लागला. 

Web Title: Rahul Gandhi Speech Deleted by Congress