राहुल गांधींवर दगडफेक भाजप कार्यकर्त्यांकडूनच ?

पीटीआय
रविवार, 6 ऑगस्ट 2017

राहुल गांधी यांच्या मोटारीवर झालेल्या दगडफेकीप्रकरणी कॉंग्रेसकडून देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. या हल्ल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि हल्लेखोरांना बांगड्यांचा आहेर पाठविण्यात येणार असल्याची माहिती गोवा महिला कॉंग्रेसकडून देण्यात आली

अहमदाबाद - गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मोटारीवर झालेल्या दगडफेक प्रकरणात हात असलेल्या तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. भागवानदास पटेल, मोरसिंह राव आणि मुकेश ठाकूर अशी या तीन संशयितांची नावे असून, ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावा कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या गांधी यांच्या मोटारीवर शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात त्यांचा सुरक्षा रक्षक जखमी झाला होता आणि मोटारीच्या काचाही फुटल्या होत्या.

गांधी यांच्या मोटारीवरील हल्ला प्रकरणाच्या चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शनिवारी (ता. 5) जयेश दार्जी याला अटक केली आहे. दार्जी हा भारतीय जनता युवा मोर्चाचा (भाजयुमो) स्थानिक पदाधिकारी आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी आणखी तीन जणांची नावे समोर आली असून, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. हे तिघेही सध्या फरार आहेत, असे धनेरा विभागाचे पोलिस निरिक्षक जे. एन. कांत यांनी सांगितले.

या प्रकरणी दार्जी आणि इतर तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोटारीवर दगडफेक झाल्यानंतर गांधी यांना आपला दौरा आवरता घ्यावा लागला होता. या घटनेनंतर कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली.

मोदी, शहांना बांगड्यांचा आहेर
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मोटारीवर झालेल्या दगडफेकीप्रकरणी कॉंग्रेसकडून देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. या हल्ल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि हल्लेखोरांना बांगड्यांचा आहेर पाठविण्यात येणार असल्याची माहिती गोवा महिला कॉंग्रेसकडून देण्यात आली.